दळणवळण
…या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करा-सूचना

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदार संघातील नागरीकांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या सावळीविहीर-कोपरगाव (राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी) या रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना व संबंधित ठेकेदार प्रतिनिधीला दिल्या आहेत.

“राष्ट्रीय महामार्ग क्र.एन.एच.७५२ जी सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या ११ किलोमीटर रस्त्याचे काम अंतिम टप्याकडे जात असून सावळीविहीर फाटा ते पुणतांबा फाटा पर्यंत तसेच बेट नाक्याच्या पुढे काम पूर्ण झालेले आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
उत्तर नगर जिल्ह्यासह उत्तर भारतीयांना दळणवळणासाठी महत्वाचा ठरणारा नगर मनमाड रस्त्याला पूर्ण होण्यासाठी येणाऱ्या अडचणी संपण्याची चिन्हे काही दिसत नाही.उड्डाण पूल,सर्व्हिस रस्ते अद्याप पूर्ण होण्याचे नाव घेताना दिसत नाही.त्यामुळे या रस्त्यावरील अपघातात कमतरता येण्याची चिन्हे नाही.परिणामी जनतेत या मार्गाबाबत मोठ्या संतप्त प्रतिक्रिया दिसत आहे.कोपरगाव नजीक असणारा पुणतांबा फाटा चौफुली,झगडेफाटा चौफुली व कोपरगाव बेट येथील उड्डाण पूल आदींचे कामे वर्षानुवर्षे होताना दिसत नाही.झगडे फाटा ते वडगाव पान याला मुहूर्त लागेना.त्यामुळे यावर प्रवासी आणि वाहतूकदार लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आदींना शेलकी विशेषणे लावत आहे.
दरम्यान याबाबत नुकतीच सावळीविहीर फाटा,कोपरगाव,मनमाड ते सेंधवा (म.प्र.) पर्यंतच्या महामार्गाबाबत आ.आशुतोष काळे यांनी एक अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती.या बैठकीसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता यशवंत कोलते,नितीन यविल,विनोद मेने,ठेकेदार प्रतिनिधी श्री.पालवे,गंभीरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या महामार्ग क्र.एन.एच.७५२ जी सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या ११ किलोमीटर रस्त्यासाठी त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने तब्बल १९१ कोटी निधी मिळविला असल्याचा दावा यापूर्वीच केला होता.या रस्त्याचे काम अंतिम टप्याकडे जात असून सावळीविहीर फाटा ते पुणतांबा फाटा पर्यंत तसेच बेट नाक्याच्या पुढे काम पूर्ण झालेले आहे त्यामुळे बहुतांश प्रमाणात वाहतुकीची समस्या संपुष्टात आली असल्याचे म्हटले आहे.
पुणतांबा फाटा व बेट नाका परिसर सोडल्यास रस्त्याचे काम पूर्ण होवून गोदावरी नदीवरील पूलही वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे नागरीकांच्या व वाहनधारकांच्या समस्या कमी झाल्या आहेत.पुणतांबा फाटा चौफुलीच्या दोन्ही बाजूने सर्विस रोडचे काम पूर्ण होवून बेट नाका या ठिकाणी काम सुरु आहे.त्यामुळे वाहतुकीच्या अडचणी दूर झाल्या असल्या तरी सुरु असलेल्या कामाची गती वाढवून पुणतांबा फाटा व बेट नाका परिसरातील रस्त्याचे उर्वरित काम लवकरात लवकर काम पूर्ण होईल याची काळजी घ्या अशा सूचना आ.काळे यांनी यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना व संबंधित ठेकेदार प्रतिनिधीला दिल्या असल्याचे माहिती हाती आली आहे.हिच काय तेवढी समाधानाची बाब.



