पर्यटन व तीर्थक्षेत्र
गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता साई भक्ताविना संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने दिनांक ०४ जुलै पासून सुरु असलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता नुकतीच काल्याच्या किर्तनानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते दहिहंडी फोडून झाली आहे.
उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे ०४.३० वाजता श्रींची काकड आरती झाली. त्यानंतर पहाटे ०५.१० वाजता श्रींना मंगलस्नान व शिर्डी माझे पंढरपूर ही आरती झाली. सकाळी ०६.०० वाजता संस्थानचे पुजारी विलास जोशी यांनी सपत्नीक समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा केली. तर सकाळी ०७.३० वाजता पुजारी चंद्रकांत गोरकर यांनी सपत्नीक गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पुजा केली आहे. सकाळी १०.०० वाजता पुजारी उल्हास वाळुंजकर यांच्या काल्याच्या किर्तनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.डोंगरे यांच्या हस्ते दहिहंडी फोडण्यात आली.
याप्रसंगी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, मंदिर प्रमुख रमेश चौधरी आदी उपस्थित होते. त्यानंतर १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. सायं.०७.०० वाजता धुपारती व रात्रौ १०.३० वाजता शेजारती झाली.