खेळजगत
मुलांच्या मानसिक परिपक्वतेसाठी मैदानी खेळ आवश्यक-राजेंद्र कोतकर
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
विद्यार्थ्यांना आपले सशक्त शरीर संवर्धन व मानसिक परिपक्वतेसाठी मैदानी खेळाशिवाय अन्य दुसरा कोणताही चांगला पर्याय नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य क्रिडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी नुकतेच कोकमठाण येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
केंद्रिय माध्यमिक मंडळ व आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे सी.बी.एस.ई क्लस्टर – 9 व्या खो-खो राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच राजस्थानचे व्यावसायिक राजेंद्र पोगलिया व महाराष्ट्र राज्य क्रिडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांचे हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेत 17 व 19 या वयोगटात मुले व मुलींच्या राज्यभरातून 42 संघांनी सहभाग घेतला आहे.
सदर प्रसंगी परमानंद महाराज म्हटले की, खेळामध्ये शारिरीक तंदुरूस्ती, नियमित सराव याबरोबरच गरज असते ती एकाग्रतेची आणि एकाग्रतेसाठी आवश्यक आहे ध्यान. नियमितपणाने ध्यान केल्यास आत्मबल वाढीस लागते . आत्मबलाच्या जोरावर कोणतेही यश प्राप्त करता येते. त्यासाठी सर्वांनी नियमितपणे ध्यान करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
यावेळी व्यासपीठावर ध्यान योग मिशनचे अध्यक्ष परमानंद महाराज, राजनंद महाराज, चंद्रानंद महाराज, ब्रम्हांडानंद महाराज आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी विश्वस्त बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे प्राचार्य कांतीलाल पटेल,प्राचार्य सुधाकर मलिक, नामदेव डांगे, स्पर्धा निरीक्षक अमेय भोजणे, स्पर्धा प्रमुख सुरेश शिंदे, पंचप्रमुख गणेश म्हस्के, क्रिडा विभाग प्रमुख अशोक कांगणे आदि उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, आज मुले दुरचित्रवाहिन्या, भ्रमणध्वनी आदी मायावी संकल्पनामध्ये जास्त अडकलेली दिसतात. मात्र अशा स्पर्धेच्या निमित्ताने मुलांना मैदानावर पाहून अभिमान वाटतो. शरीर संवर्धन व मानसिक परिपक्वतेसाठी मैदानी खेळाशिवाय दुसरा कोणताही चांगला पर्याय नाही. सीबीएसईच्या विद्याथ्र्यांना क्लस्टर व जिल्हा क्रिडा कार्यालयामार्फत होणा-या दोन्हीही स्पर्धेत भाग घेता येतो. या संधीचा सर्व खेळाडुंनी फायदा घ्यावा व आपले ध्येय गाठावे. आत्मा मालिकचे क्रीडाक्षेत्रासाठी मोठे योगदान आहे. या ठिकाणी खेळासाठी आवश्यक सर्व सुविधा आहे. आत्मा मालिक सारख्या संस्था देशभरात क्रिडा क्षेत्रासाठी उभ्या राहिल्या तर खेळासाठी निश्चितच उज्ज्वल भविष्य राहिल असे यावेळी त्यांनी सांगितले.
सीबीएसईचा विद्यार्थी यश वानखेडे यांनी खेळाडूंना क्रिडाशपथ दिली. आत्मा मालिकच्या खेळाडूंनी यावेळी विविध कसरती सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक स्पर्धा निरीक्षक अमेय भोजणे यांनी केले. तर मान्यवरांचे आभार प्राचार्य कांतीलाल पटेल यांनी मांडले तर सुत्रसंचलन अजय देसाई यांनी केले.
या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी क्रिडा शिक्षक शशेंद्र त्रिपाठी, नितिन सोळके, अजित पवार, बाळासाहेब कोतकर, रविंद्र नेहे, आण्णासाहेब गोपाळ, राजेंद्र ससाणे, रूपाली आहेर, सुषमा सिंह आदी परीश्रम घेत आहे.