धार्मिक
दुःखावर मात करण्याचा विश्वास संतांनी निर्माण केला-…या किर्तनकारांचे प्रतिपादन
न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
उत्तम चारित्र्य,धर्मनिष्ठा,भूतदया,सदाचार आणि नीती या गुणांचा वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मात अंतर्भाव असावा हे संस्कार संतांनी माणसांच्या मनावर रुजविण्याबरोबरच या संप्रदायाच्या संस्कारातून दुःखावर मात करण्याचा विश्वास लोकांमध्ये निर्माण केला असे प्रतिपादन ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प. मीराबाई मिरीकर यांनी संवत्सर येथे किर्तनातून केले आहे.
कोपरगाव तालुक्यतील संवत्सर येथे ऋषीपंचमीनिमित्त गोदावरी नदीत महिलांनी स्नानांची पर्वणी साधली.त्यानिमित्त ह.भ.प. मीराबाई मिरीकर यांचे शनी महाराज मंदिराच्या प्रांगणात किर्तन आयोजित करण्यात आले होते त्या वेळी त्या बोलत होत्या.
सदर प्रसंगी अनेक संत महंतांसह मान्यवरांची उपस्थिती होती.प्रारंभी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी ग्रामस्थांच्यावतीने मीराबाईंचा सत्कार करुन उपस्थितांचे स्वागत केले आहे.
संतांनी कधीच चातुर्वण्यांच्या आणि जातीव्यवस्थेच्या चौकटीविरुद्ध बंड उभारले नाही.तथापि आध्यात्मिक समता निश्चितपणे प्रस्थापित केली. परमेश्वराला सर्वच भक्त सारखे असतात ही शिकवण देताना जीवनात कोणतीही साधाना केली नाही तरी चालेल परंतु सत्य बोला हा उपदेश संतांनी केला असल्याचे सांगून मीराबाई यांनी वारकरी संप्रदायाची महती सांगितली.महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली आहे.जगाच्या पाठिवर कुठेही नाही इतकी प्रचंड अभंग,संतसाहित्य परंपरा महाराष्ट्राच्या भूमीत आहे.संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातलेला आहे. त्यातून संत नामदेवांनी किर्तनासारखी सुलभ साधना निर्माण करुन दिलेली आहे.संतांचा सहवास प्राप्त करण्यासाठी माणसाला त्यांच्याजवळ जावे लागेल.हा मार्ग खूप सोपा आहे परंतु माणूस वाट चुकतो आणि नको तिकडे भरकटत जातो. त्यामुळे संत तर भेटत नाहीच पण परमेश्वरही भेटत नाही आणि जीवनाचा आनंदही मिळत नाही. आनंद कशाने मिळविता येईल हेच त्याला कळत नाही. या कलियुगात माणसाला सहज करता येणारी गोष्ट म्हणजे भगवंताचे नामस्मरण, दीनदुबळ्यांची सेवा.एवढे जरी करता आले तरी माणसाला आनंदाची प्राप्ती होईल.
किर्तनातून समाज घडला पाहिजे ही अपेक्षा असताना आजकाल मात्र किर्तनाची पातळी खालावत चालल्याचे भिषण वास्तव समोर दिसत आहे.दोन अडीच तास लोकांची करमणूक करणे हेच काम काही किर्तनकार करताना दिसत असल्याची खंत व्यक्त करुन मीराबाई यांनी ऋषीपंचमीचे महत्व व या दिवशी महिलांनी आचरण करावयाचे नियम याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. स्व. नामदेवराव परजणे आण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेली अनेक वर्षापासूनची ही परंपरा युगानुयुगे चालणार असून गोदावरीच्या काठावरील हा आध्यात्मिक यज्ञ अखंडपणे तेवत राहील अशी अपेक्षाही त्यांनी केली.
ऋषीपंचमीनिमित्त गोदावरी नदीत स्नानाची पर्वणी साध्य करण्यासाठी महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. संपूर्ण गोदाकाठ भक्तीमय झालेला होता. संवत्सरला श्री क्षेत्र पंढरीचे स्वरुप प्राप्त झाले होते.त्यातच किर्तन श्रवणाचा लाभ मिळत असल्याने औरंगाबाद,नाशिक,अ.नगर अशा विविध ठिकाणावरुन भावीक,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ग्रामस्थांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचाही भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.