कृषी विभाग
पिकेल ते विकेल योजनेतून शेतकरी व ग्राहकांचा फायदा-आशावाद
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शेतकरी गट व फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांचा योग्य समन्वय साधल्यास शेतकऱ्याच्या मालाला शेतकऱ्यांना अपेक्षित असलेल्या बाजारभावाची बाजारपेठ उपलब्ध होईल.पिकेल ते विकेल या अभियानातून शेतकरी व ग्राहक दोघांचा फायदा होवून शेतकरी आर्थिकदृष्ट्या प्रगत होण्यासाठी निश्चितपणे मदत होईल असा आशावाद आ.आशुतोष काळे यांनी कोपरगावात एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला आहे.
शेतमालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनाने नवीन योजना आणली आहे.’विकेल ते पिकेल’ या धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान राज्यात राबविण्यात येणार आहे.यामुळे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था अधिक बळकट होणार आहे.
शेतमालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनाने नवीन योजना आणली आहे.’विकेल ते पिकेल’ या धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान राज्यात राबविण्यात येणार आहे.यामुळे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था अधिक बळकट होणार असून शेतकऱ्यांनी कोणत्या पिकांची लागवड करावी,बियाणे कोणते घ्यावे,शेतमालाची स्वच्छता व प्रतवारी,विक्री व्यवस्थापन आदींची माहिती कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मिळणार आहे.त्याचबरोबर शेतमालाला चांगला भाव मिळण्याची आशा आहे.या उपक्रमांतर्गत शेतकरी अथवा शेतकरी गट ह्या व्यवस्थेद्वारे थेट ग्राहकांपर्यंत जोडण्यात येणार आहे.
कोपरगाव तहसील कार्यालय येथे पिकेल ते विकेल अभियानातर्गत तालुकास्तरीय समिती बैठक व तालुकास्तरीय शेतकरी समनव्य समितीची बैठक नुकतीच तहसील इमारतीत कृषी विभागाने आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आत्मा प्रकल्प उपसंचालक राजाराम गायकवाड, तहसीलदार योगेश चंद्रे,कोपरगाव पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी दिलीप दहे,तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव,कृषी अधिकारी पंडित वाघिरे,सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशूर,आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक शैलेश आहेर,प्रगतिशील शेतकरी विजय जाधव,गणेश घाटे, दिलीप शिंदे,विठ्ठल जावळे,बाबासाहेब लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”पिकेल ते विकेल या अभियानाचा उद्देश शेतकरी व ग्राहक यांच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे.सरकारने याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार या अभियानाचे योग्य नियोजन करून कृषी विभागाने पिकेल ते विकेल या अभियानाचे आदर्शवत मॉडेल उभे करून शेतकरी व फार्मर प्रोड्युसर कंपन्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावे.शेतकऱ्यांनी ज्या पिकाला जास्त बाजारभाव मिळतो त्याच पिकाचे उत्पन्न न घेता इतरही पिके घेतली पाहिजे.यदाकदाचित सर्वच शेतकऱ्यांनी एकाच पिकाचे उत्पन्न घेतल्यास त्या पिकाला कमी बाजारभाव मिळून शेतकऱ्यांचे नुकसान होवू शकते.त्यामुळे शेतकऱ्यांनी इतरही पिकांचे उत्पादन घ्यावे. दुसऱ्या पिकाच्या उत्पादनातून शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघेल यासाठी शेतकऱ्यांनी सर्व प्रकारची पिके घेतली पाहिजे असे आवाहन शेवटी आ. काळे यांनी केले आहे.
त्या वेळी आत्माचे प्रकल्प उपसंचालक राजाराम गायकवाड यांनी संत सावता माळी रयत बाजार अभियानाचे सादरीकरण केले.