कृषी विभाग
राज्यात भेसळयुक्त दूधाचा मोठा घोटाळा-…यांचा आरोप

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यातील दूध धंद्यात शेतकऱ्यांकडून दूध खरेदी केल्यावर त्यात आपल्या आर्थिक फायद्यासाठी मोठी भेसळ होत असून त्यातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान तर विविध संस्थांचे उखळ पांढरे होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी श्रीरामपूर तालुक्यात उंदिरंगाव येथे एका बैठकीत नुकताच केला आहे.

“सोलापूर जिल्हा दुग्ध पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार गाईच्या एक लिटर दुधास ६५ रुपये प्रति लिटर तर म्हशीच्या एक लिटर दुधास ९२ रुपये प्रति लिटर उत्पादन खर्च येतो.या बाबींचा विचार करता डॉ.स्वामीनाथन समितीच्या शिफारशी प्रमाणे उत्पादन खर्च+५० टक्के नफा या सूत्राप्रमाणे गाईच्या दुधास ९० रुपये प्रति लिटर तर म्हशीच्या दुधात १३५ रुपये प्रति लिटर दर देने क्रमप्राप्त आहे”-ऍड.अजित काळे,उपाध्यक्ष,शेतकरी संघटना.
ताजे आणि शुद्ध दूध हे पोषक तत्वांनी समृद्ध आहे ज्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो.शुद्ध दुधात आढळणारी काही प्रमुख पोषक तत्त्वे आणि त्यांचे मोठे फायदे आहेत.दुधाचा घटक सामान्यतः हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी आवश्यक कार्य म्हणून ओळखला जातो.हे स्नायूंच्या निर्मितीमध्ये,मज्जातंतूंमध्ये त्याचे मोठे कार्य आहे.दुधातील प्रथिने ऊती आणि अवयव प्रणालींच्या विकासामध्ये तसेच रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये गुंतलेली असतात.मात्र अलीकडील काही वर्षात अनेक निषिद्ध पदार्थांची त्यात भेसळ करून आपल्या आर्थिक फायद्यासाठी त्याचे विष बनविण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे दिसून येत आहे.भेसळ करणाऱ्यांचा दूध उत्पादकांशी काही संबध असल्याचे दिसून येत नाही हे विशेष ! ही लूट शेतकऱ्यांनी आपले दूध संकलन करणाऱ्या पासून सुरु होत असल्याने या बाबत शेतकरी संघटनेने आवाज उठवला आहे.व त्यासाठी आगामी २६ जून रोजी श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा या ठिकाणी,’रास्ता रोको’ आंदोलन पुकारले आहे.त्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेने उंदिरगाव येथे एका बैठकीचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते.बैठकीच्या अध्यक्षस्थानी अप्पासाहेब ताके हे होते.
सदर प्रसंगी नगर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,डॉ.दादासाहेब आदिक,साहेबराव चोरमल,डॉ.विकास नवले, माळेवाडी सोसायटीचे अध्यक्ष दिलीप औताडे,अरुण मुठे,संदीप नवले,बाळासाहेब आसणे,सुनील आसणे,बाळासाहेब घोडे,बबनराव नाईक,प्रकाश ताके,सुनील भारदंड,प्रमोद भालदंड,राजेंद्र गुंड,सतीश नाईक यांच्यासह बहुसंख्य दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

“मागील एक वर्षांपूर्वी ठाकरे सरकारच्या काळात ३४ ते ३८ रुपये प्रति लिटर असलेले दुधाचे दर शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर सातत्याने कमी होत जाऊन २२ रुपये प्रति लिटर इतक्या किमान पातळीवर आले आहे.याला जबाबदार कोण ? युवराज जगताप,अध्यक्ष,शेतकरी संघटना,श्रीरामपूर तालुका.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”राज्यासह देशात इतर कुठल्याही मालावर एम.आर.पी.छापून तिची विक्री होत आहे.परंतु शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कुठल्याही मालाला एम.आर.पी.नाही ही राज्यातील दुर्दैवी घटना असून इथेच शेतकऱ्यांचा घात झालेला आहे.स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काँग्रेस सरकारने ही शेतकऱ्यांच्या शेत मालाला कायदेशीर किमतीचा कायदा तयार केला नसून त्याच पद्धतीने गेल्या दहा वर्षापासून भाजप सरकारने त्यात बदल केले नाही.दुधासह सर्वच शेतमालाला आधारभूत किमतीला किंवा डॉ.स्वामीनाथन आयोगाला कायदेशीर आधार मिळावा म्हणून आपण शेतकऱ्यांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांच्या ताकदीवर रस्त्यावरील लढाई लढणार आहोत या लढाईसाठी आपण साथ द्यावी”असे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केला आहे.तसेच न्यायालयाच्या माध्यमातून ही आपण आपली वकिली पणाला लावून न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचा इशारा सरकारला दिला आहे.वर्तमानात शेतकऱ्यांचा दूध हा पूरक व्यवसाय राहिला नसून मुख्य व्यवसाय झालेला आहे.या व्यवसायावर बहुतांश शेतकऱ्याचे कुटुंबाचे चरितार्थ चालवण्याकरता अर्थकरण अवलंबून झालेली आहे.मागील एक वर्षांपूर्वी ठाकरे सरकारच्या काळात ३४/- ते ३८/-रुपये प्रति लिटर असलेले दुधाचे दर शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर सातत्याने कमी होत जाऊन २२/- रुपये प्रति लिटर इतक्या किमान पातळीवर आले आहे.याला जबाबदार कोण ? याबाबत आपण राज्य शासनाच्या वेळोवेळी निघालेल्या अध्यादेशाचा अभ्यास केल्यानंतर २७ रुपये प्रति लिटर असलेला शासन आदेश बदलून त्यामध्ये २५ रुपये प्रतिलिटर चा काढला व सदर शासन आदेशाचे शुद्धिपत्रक काढून ०५ रुपये अनुदानाचा अध्यादेश काढला गेला होता.अनुदानाच्या अध्यादेशामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.भाव कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदान मिळेल ही अपेक्षा होती परंतु शेतकऱ्यांना सदर अनुदान अद्यापही मिळालेले नाही.मागील गेल्या जवळपास एक वर्षापासून शेतकरी प्रति लिटर पंधरा रुपये तोटा सहन करत आहे.
सोलापूर जिल्हा दुग्ध पशुसंवर्धन अधिकारी यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गाईच्या एक लिटर दुधास ६५ रुपये प्रति लिटर उत्पादन खर्च तर म्हशीच्या एक लिटर दुधास ९२ रुपये प्रति लिटर खर्च येतो अशी माहिती शासनाकडूनच मिळालेली आहे.या बाबींचा विचार करता स्वामीनाथन समितीच्या शिफारशी प्रमाणे उत्पादन खर्च+५० टक्के नफा या सूत्राप्रमाणे गाईच्या दुधास ९० रुपये प्रति लिटर तर म्हशीच्या दुधात १३५ रुपये प्रति लिटर दर कायदेशीर मार्गाने देणे शासनाचे दायित्व आहे.परंतु शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर व दुग्ध मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दुग्ध मंत्रालयाचा कारभार स्विकारल्यानंतर ३८ रुपये वरून दूध २२ रुपये प्रति लिटर झाले यावरून शिंदे सरकार खरंच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे काय ? असा रोखठोक सवाल ऍड.काळे यांनी सरकारला विचारला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नंतर आम्ही शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसू अशी राणाभीमदेवी घोषणा केली होती परंतु सदर घोषणा हवेत विरून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले व राज्यात दुर्दैवाने शेतकरी आत्महत्या वाढत होत गेल्या आहेत.आपण याबाबत दुग्धविकास मंत्री विखे यांना सविस्तर असे कायदेशीर पत्र देणार आहोत.तसेच कोणत्याही शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या खटल्यांना न घाबरता मंगळवार दि.२५ जून रोजी च्या ‘रास्ता रोको’साठी हजारोच्या संख्येने उपस्थित रहा” असे आवाहनही ऍड.काळे यांनी शेवटी केले आहे.
“दरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्व प्राप्त असलेल्या गावात शेतकऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून दूध प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी संघटनेबरोबर काम करण्याचा निर्धार दूध उत्पादकांनी केला असून त्याचा परिणाम आगामी काळात राजकीय नेत्यांना पहायला मिळणार आहे”-अनिल औताडे,अध्यक्ष,शेतकरी संघटना,अ.नगर जिल्हा.