संपादकीय
कोपरगावात मंत्री भेटीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीत गृहकलह !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरात राज्य परिवहन विभागाचे बस आगार,पंचायत समिती आणि पोलीस स्थानक अशा विविध विकास कामांच्या उदघाटनासह कोपरगाव पंचायत समितीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या माजी खा.स्व.शंकरराव काळे यांच्या पुतळ्याचे अनावरण बुधवार दि.०६ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या सह विविध मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी १० वाजता करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या कामांस श्रेयवादाची किनार लाभली असून शिवसेना व राष्ट्रवादी या महाआघाडीच्या मित्र पक्षांनी आमने-सामने फलकबाजी सुरु केली असून आज वीरा पॅलेस येथे स्वतंत्र बैठक आयोजीत केली असल्याचे दिसून आले आहे.या शिवाय राष्ट्रवादितही सर्व काही आलबेल नाही हे हि ऊघड झाले आहे.त्यामुळे कोपरगाव शहर व तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत आमच्या प्रतिनिधीने उत्तर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,शिवसेना हि सत्तेत आहे त्यामुळे त्या विकास कामात त्यांचा वाटा आहेच हे वेगळे सांगण्याची गरज नाही,आमचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख येणार आहे.त्यामुळे श्रेयवादाचा प्रश्न नाही.मात्र तरीही आमची आघाडी असल्याने त्याबाबत बोलणे संयुक्तिक नाही मात्र काही गट युती काळातही नाराज होते.वर्तमानातही काही गट नाराज आहे हे खरे आहे”
कोपरगाव शहरात अनेक महिन्यापासून बांधून उदघाटनांच्या प्रतीक्षेत असलेल्या कोपरगाव शहर पोलीस ठाणे,कोपरगाव पंचायत समिती,राज्य परिवहन विभागाचे कोपरगाव बस आगार आदिंचे उदघाटनाचा मुहूर्त अनेक महिन्यांनी सापडला असून ते आगामी ०६ एप्रिल रोजी संपन्न होत आहे.दरम्यान याच कार्यक्रमात माजी खा.स्व.शंकरराव काळे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे उदघाटन संपन्न होणार आहे.
कोपरगाव पंचायत समितीच्या प्रांगणात त्यांचा पुतळा उभारण्यात आलेल्या या पुतळ्याचे अनावरणासाठी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या समवेत राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री ना.जयंत पाटील,महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात,गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील,ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ,सेनेचे जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख,ऊर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे आदी मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. तसेच कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी साई संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी जोरदार तयारी केली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार व आ.काळे यांची स्वतःची छबी असलेले फलक व राष्ट्रवादीचे झेंडे यांनी शहर झाकोळून गेले आहे.त्या तुलनेत मात्र शिवसेना व काँग्रेसच्या नेत्यांना कमी स्थान मिळाले आहे.हीच खरी खदखद दोन्ही पक्षात आहे.मात्र ती खदखद बाहेर काढण्याची ताकद शिवसेनेत आहे मात्र काँग्रेस पक्ष ती बाहेर मांडण्यास दुबळा ठरला आहे.त्याला त्यांचे वरिष्ठ नेतेच दुर्दैवाने कारणीभूत ठरले असल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडी सरकारला आता जवळपास अडीच वर्षे झाली आहे.त्यामुळे आता सरकारमधील पक्षांतर्गत नाराजी बाहेर येऊ लागली आहे.यापूर्वीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीची पंधरा वर्षे सत्ता होती तेव्हाही अनेक मुद्यावरून दोन्ही पक्षात कायम पदांसाठी,निधीसाठी रस्सीखेच सुरू असायची.यूतीच्या काळातही शिवसेना,भाजपमध्ये टोकाचा संघर्ष दिसून आला होता.
महाविकास आघाडीत निधीवाटपाच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या अंतर्गत धुसफुसीविषयी भाष्य केले.शिवसेनेतील ९० टक्के आमदार नाराज असल्याचा भाजप दावा करत आहे.मात्र सर्वस्वी खरा वाटत नाही मात्र तो पूर्णतः खोटा आहे असेही म्हणता येणार नाही.त्यासाठी जालन्याचे आ.कैलास गोरंट्याल,व भोरचे आ.संग्राम थोपटे याचे उदाहरण ताजे आहे.त्यांनी थेट महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनाच निशाणा केला आहे.व दिल्लीत त्यांची तक्रार करणार असल्याचा दावा केला होता.यंदाच्या अर्थसंकल्पाकडे नजर टाकल्यास त्यामध्ये मंत्री आणि त्यांच्या जवळच्या आमदारांनाच झुकते माप देण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला आहे.तसेच ज्याठिकाणी पैशातून कमीशन मिळेल अशा प्रकल्पांसाठीच जास्त तरतूद करण्यात आली आहे.अशा दुराग्रही भावनेने अर्थसंकल्प तयार केला तर आमदारांना काय मिळणार ? निधी न मिळाल्यास मतदारसंघाचा विकास होणार नाही.त्यामुळे दिवस पुढे सरकतील तशी महाराष्ट्रातील राजकीय असुरक्षिता वाढणार आहे.मतदारसंघात विकासकामे न झाल्याने आमदारांना असुरक्षित वाटेल.याच कारणामुळे सध्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी आहे.महाविकास आघाडीत केवळ राष्ट्रवादी खूश आहे.राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या आमदारांना स्वयंपूर्ण करत असल्याचा त्यांच्या सहयोगी पक्षांचा आरोप आहे.त्याचाच अनुभव वर्तमानात कोपरगाव तालुक्यात येत आहे.कोपरगाव शहर व तालुक्यात विविध विकास कामांना आ.काळे यांनी निधी जास्त आणला नाही तो विरोधी असलेल्या भाजपला नामोहरम करण्यासाठी दिलाच पण सह सहयोगी असलेल्या शिवसेनेला व काँग्रेस या पक्षांना दुबळे करण्यासाठी दिला आहे हे जास्त खरे आहे.पण त्यातून कोपरगावात मित्र पक्ष असलेली शिवसेनेला असुरक्षित वाटू लागले आहे.यातून राष्ट्रवादी प्रबळ होईल व आपला कचरा होईल हि साधार भीती जशी काँग्रेस आमदारांना राज्यात वाटत आहे तीच भीती येथे शिवसेनेला वाटू लागली आहे.त्यामुळे हा घोळ निर्माण झाला आहे.त्यातले त्यात कोपरगावातील काँग्रेसचे,’काँग्रेस भुवन’च राष्ट्रवादीने गिळंकृत केले आहे.त्याबाबत काँग्रेसचा एका बडा नेता व मंत्री असलेला नेता या कटात सामील आहे.वर्तमानात काँग्रेस भवन हे जेऊर पाटोदा हद्दीत गावकुसाबाहेर घालवले आहे.त्या बाबत कोणीही बोलायला तयार नाही.मात्र या विकास कामांच्या श्रेय वादात हिरीरीने सहभागी होत असणारा किंबहुना अग्रणी असणारा भाजप कोल्हे गट दिसत नाही कारण काही दिवसापूर्वी जेष्ठ नेते व माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन झाले आहे.अन्यथा मुक्तचस संपन्न झालेला शिमगा पुन्हा अधिकचा रंगला असता हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही.
कोपरगाव शिवसेनेचे शहर प्रमुख कलविंदर दडियाल यांचेशी आमच्या प्रतिनिधीने फलकबाजी बाबत संपर्क साधला असता त्यांनी,” याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही” असे म्हणून कानावर हात ठेवला आहे.तर उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे यांनी मात्र निमंत्रण पत्रिकेत शिर्डीचे खा.सदाशिव लोखंडे यांचे नाव नाही याबाबत स्पष्ट शब्दात नाराजी दाखवली आहे.तर तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी,”शिवसेना विकास कामांना प्राधान्य देत असून बस स्थानकाजवळ विस्थापितांना न्याय देण्यासाठी गाळे बांधण्यासाठी प्रयत्नशील आहे.तालुक्यात व शहरात खंडकऱ्यांच्या जमिनी व घरकुले करण्यास प्राधान्य देत आहे.शिवसेना कोणाशी बांधील नाही असे म्हटले आहे”
दरम्यान वर्तमानात आ.आशुतोष काळे यांच्या व माजी आ.कोल्हे यांच्या मागे महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टच्या जवळपास ५३ एकरच्या सरकारी जमिनीचे शुक्लकाष्ठ लागले आहे.ती जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी सरकार जमा केली आहे.त्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठाने त्यांच्या विरुद्ध निकाल दिला आहे.त्या विरोधात त्यांचा कनिष्ठ न्यायालायत व आयुक्त कार्यालयात वेळकाढूपणा सुरु आहे.मात्र त्या व विरोधात शिवसेनेचेच माजी उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब जाधव हे हात धुवून लागले आहे.या पार्श्वभूमीवर हा उदघाटन सोहळा संपन्न होत आहे.त्यामुळे कोकमठाण सोसायटी काळे गट व शिवसेनेला हातची गमवावी लागली आहे.तेथे भाजप व राष्ट्रवादी अशी म्हणजे काळे-कोल्हे युती जन्माला आली आहे.असे तालुक्यात अनेक ठिकाणी झाले आहे.मात्र त्यावर महाआघाडीतील मित्र पक्षांचे,”मै नकटी,तू नकटी सब नक्तीयोंका मेला…! अशी अवस्था झाली आहे.त्यामुळे कोणी कोनाविरुद्ध बोलायचे ? असा सारा मामला तयार झाला आहे.
कोपरगाव पंचायत समितीच्या आवारात आपल्याच पदाधिकारी व पंचायत समिती सदस्य यांनी आपली नाराजी आमच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त केली आहे.कारण आपण या इमारतीसाठी एवढी वर्ष खर्ची घालूनही आपले साधे कोंनशिलेवर साधे नाव नाही ? हिभावना त्यांना आपले आपल्या नेत्याजवळचे स्थान नेमके कोठे आहे हे दर्शवत आहे.एकवेळ आता कालावधी संपला म्हणून आमचे नाव नाही हे एकवेळ ठीक पण भूमीपूजनाचे काय ? त्यामुळे दोन्ही घरचा पाहूणा उपाशी अशी अवस्था त्यांच्या वाट्याला आली आहे.आता आमचा कालावधी संपला पण यापूर्वी भूमिपूजन करताना तर आम्ही सत्तेत होतो ना! असा त्यांचा रास्त सवाल आहे.मात्र त्याची दखल कोणालाही घ्यावी वाटली नाही.म्हणजे राष्ट्रवादीतही सर्व मामला आलबेल नाही हे प्रकर्षाने नमूद केले पाहिजे.अनेक सदस्यांनी आपले नाव न छापण्याच्या अटीवर हा भंडाफोड केला आहे हे विशेष ! कारण आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या निवडणूक आहेत.उमेदवारीसाठी पुन्हा याच नेत्यांच्या दारी कटोरा घेऊन जायचे आहे याचे मात्र त्यांना भान आहे.