गुन्हे विषयक
चोरट्यांचे मोठे धाडस,बँकेचे ए.टी.एम.नेले ओढून,शिर्डीत गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव ग्रामपंचायत हद्दीत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या इंडियन ओव्हरसीज बँकेचे ए.टी.एम.अज्ञात दोन चोरट्यांनी अक्षरशः वायर रोप लावून तोडून व ओढून नेले होते मात्र ते फोडण्यात त्यांना अपयश आल्याने त्यांचे श्रम वाया गेले आहे.मात्र पोहेगाव ग्रामस्थ आणि पोलिसांच्या नाकावर टिचून चोरट्यांनीं केलेले धाडस चर्चेचा मोठा विषय ठरले आहे.या घटनेने कोपरगाव आणि राहाता तालुक्यातील ग्रामस्थांत मोठी खळबळ उडाली आहे.
दोन्ही संकल्पित छायाचित्रे.
दरम्यान शिर्डी पोलीस अधिकारी नंदकुमार दुधाळ यांनी या बाबत आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे की,”चोरट्यांना सदर ए.टी.एम.फोडता न आल्याने त्यांनी आपल्या वाहनाच्या साहाय्याने ते दूर सुमारे तीन कि.मी.अंतरावर ओढून नेले होते मात्र त्या ठिकाणी तांत्रिक माहिती नसल्याने त्यांना ते उघडता आले नाही.त्यामुळे त्यातील ०१ लाख ३२ हजारांची रक्कम वाचली आहे.
सदरचे सविस्तर वृत असे की,कोपरगाव शहर आणि तालुक्यात चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरी थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र तयार झाले आहे.राजकीय नेते आणि पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे. त्यामुळे चोरट्यांवर पोलिसांचा आणि पोलिसांवर नेत्यांचा धाक राहिलेला दिसत नाही असा आरोप नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे.गत काही महिन्यात रात्रीच्या सुमारास नागरीक सामसूम झाल्यावर चोरट्यांनी पोलिसांना हुलकावणी देऊन शहरातील निवारा-सुभद्रानगर परिसरातून डॉ.जगदीश झंवर,सह्याद्री कॉलनी येथील लेखापरीक्षक दत्तात्रय खेमनर,आणि साईनगर या परिसरातून अड्.मनोज कडू यांची असे तब्बल एक-दोन नव्हे तर एक स्विफ्ट डिझायरसह दोन एर्टीगा अशा तीन कार चोरून आपला महा प्रताप दाखवला होता व पोलिसांना खुले आव्हान दिले होते.तर त्यानंतर सुभद्रानगर येथील पी.विल्यम एस.पी.चंदन या इसमाच्या घरातून सोन्याची साखळी व दोन अंगठ्या असा ०१ लाख २५ हजारांचा ऐवज लंपास केला होता अद्याप या चोरट्यांचा तपास लागलेला नाही.रोज होणाऱ्या दुचाकी चोऱ्याची तर मोजदाद नाही.त्यामुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून जगावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण झाले आहे.अशीच मोठी घटना कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे व शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.तेथे इंडियन ओव्हरसिज बँक असून सदर बँक हि ऐन गावाच्या मध्यवर्ती व रस्त्याच्या कडेला आहे.तरीही काल रात्री ३.१५ वाजेच्या सुमारास दोन चोरट्यांनी आपल्या तोंडावर मुखपट्ट्या बांधून ए.टी.एम.फोडता येत नाही हे पाहून आपल्या ताब्यातील महिंद्रा पिकअप या चारचाकीचा वापर करून एका वायर रोपच्या साहाय्याने सदर ए.टी.एम.ओढून बाहेर काढले व त्यास फरफट नेऊन गावाच्या पश्चिमेस साधारण तीन कि.मी.अंतरावर असलेल्या गोदावरी कालव्याच्या कडेला काटवणात लपवून ठेवले होते.
दरम्यान पोहेगाव गावात मोठी बाजारपेठ असताना त्या ठिकाणी वारंवार चोऱ्या होत असताना त्या ठिकाणी व्यापारी अथवा ग्रामपंचायतीने सुरक्षा रक्षक नेमलेला नाही किंवा चलचित्रण सुविधा निर्माण केलेली नाही हे विशेष यामुळे गुन्हेगार पकडण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
सदरची बाब सकाळी दूध घालणाऱ्या ग्रामस्थांच्या व शेतकऱ्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी सदर घटना बँकेच्या व्यवस्थापक शेखर कोरडे यांना दूरध्वनीवर कळवली होती.त्यांनी तत्काळ सदरची बाब सात वाजता शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना कळवली होती.त्यांनी वेळेचा अपव्यय न करता घटनास्थळी धाव घेऊन स्थळ पंचनामा केला आहे.व याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात शाखा व्यवस्थापक शेखर कोरडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान घटनास्थळी शिर्डी उपविभागागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचे सह पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दुधाळ हे करीत आहेत.दरम्यान य घटनेने कोपरगाव तालुका शिर्डी शहर आणि राहता तालुक्यात खळबळ उडाली आहे.