गुन्हे विषयक
मंदिरातील दानपेटीची चोरी,कोपरगावात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात साधारण सव्वा वर्षांपूर्वी चांदेकसारे हद्दीतील भैरवनाथ मंदिरातील दानपेटी फोडण्याची घटना घडल्यानंतर आता पुन्हा एक दानपेटी फोडून त्यातील अवैज चोरून नेल्याची घटना याच तालुक्यातील तळेगाव मळे येथील शनैश्वर मंदिरात उघडकीस आली असून त्यामुळे भाविकांत खळबळ उडाली आहे.
यापूर्वी चांदेकसारे हद्दीत जोगेश्वरी,भैरवनाथ मंदिरात सोमवार दि.०९ ऑगष्ट २०२१ रोजीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराची दानपेटी पळविली होती.संबंधित दानपेटी दूरवर एका ठिकाणी सापडली होती.चोरटे तेथे मंदिरात असलेल्या चलचित्रफितीत जेरबंद झाले होते.त्यानंतर दीड वर्षाच्या आत हि दुसरी घटना उघड झाली आहे.त्यामुळे जुन्या चोरट्यांनीं हिच पद्धत वापरली असल्याने चोरटे तेच असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोपरगाव तालुक्यातील पूर्वेस साधारण १८ कि.मी.अंतरावर असलेल्या जुना मुंबई-नागपूर या राज्य मार्गाच्या उत्तर बाजूस तळेगाव मळे हे धार्मिक ठिकाण असून येथे भगवान शैनेश्वर यांचे हे प्राचीन मंदिर आहे.त्यावर कोपरगाव सह अ.नगर सह औरंगाबाद,नाशिक जिल्ह्यातील भाविकांची मोठी श्रद्धा आहे.त्यामुळे या ठिकाणी शनिवारसह अन्य वेळी हि भाविकांची बऱ्यापैकी वर्दळ असते.व त्यामुळे तेथे असलेल्या मंदिरातील व सभामंडपातील दान पेटीत बऱ्यापैकी गुप्तदान मिळते.मात्र त्यावर आता चोरट्यांची वक्रदृष्टी वळाली असून त्यांनी आपली शनिदेवास थेट चौर्य लीला दाखवली आहे.
त्यांनी काल रात्री म्हणजेच दि.०३ फेब्रुवारी रोजी रात्री ०७ वाजेच्या दरम्यान येथील शनैश्वर मंदिराची सायंकाळची आरती आटोपल्यावर तेथे मंदिराला कुलूप लावले जाते.त्यानंतर कधीतरी अज्ञात चोरट्यांनी त्या मंदिरातील दान पेटी उचकटून ती पळवून नेली आहे.हि घटना सकाळी भाविकांच्या व ग्रामस्थांच्या लक्षात आली असता त्यांनी त्याची खबर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना कळवली आहे.येथील तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आपले सहकारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड व अन्य सहकाऱ्यांना घटनास्थळी धाडले असून त्यांनी आज दिवसभर आरोपींचा शोध घेतला असता ते त्यानां मिळाले नाही मात्र त्यांनी पळवलेली दानपेटी मात्र गावाच्या दक्षिणेस साधारण अर्धा कि.मी.अंतरावर एका ओढ्याच्या लगत असलेल्या एका विहिरीत आढळून आली आहे.ती पोलिसांनी स्थळ पंचनामा करून ताब्यात घेतली असून अज्ञातच चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सदर दानपेटीत साधारण ६५-७० रुपयांची रोकड अन्य चीजवस्तू असावी असा अंदाज माहितगार व्यक्तीकडून व्यक्त होत आहे.एक ते दीड वर्षापूर्वीची या मंदिरातील दानपेटी चोरीस गेली होती अशी माहिती मिळत आहे.त्यामुळे पोलिसांना आता सदर दानपेटी चोरीस चटावलेले चोरटे शोधण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
या प्रकरणी तेथिल शनैश्वर ट्रस्टचे अध्यक्ष गोरक्षनाथ पाटीलबा टुपके यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु केले असल्याची माहिती माहितगार सूत्रांनी दिली आहे.