गुन्हे विषयक
कोपरगाव सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू,चौकशीची मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश शिवारातील ईशान्य गडावरील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सैनिकी स्कुलचा इयत्ता बारावीतील विद्यार्थी व येवला तालुक्यातील सत्यगाव येथील रहिवासी सौरभ अण्णा सांगळे (वय-१७ वर्ष) यांचा गारदा नदीच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पडून संशयास्पद मृत्यू झाल्याने कोपरगावसह नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली असून या प्रकरणी मयत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.

दरम्यान या मृत्यूबाबत विविध तर्कवितर्काना उधाण आले असून सैनिकी स्कुल येथे मुलांना पोहण्यासह सर्व शिक्षण दिले जात असताना तो बुडाला कसा असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.शिवाय त्या ठिकाणी सैनिकी शाळा ही निवासी आहे.तेथे चल चित्रणासाठी सी.सी.टी.व्ही.कॅमेरे आहेत या शिवाय वसतिगृहामध्ये सर्व विद्यार्थी नियंत्रकांच्या ताब्यात असताना रात्रीच्या सुमारास हा विद्यार्थी बाहेर गेलाच कसा ? असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.त्यामुळे या संस्थेच्या कारभारावरच प्रश्न चिन्ह लागले आहे.तसेच ही संस्था व तिचे पदाधिकारी आदींना राजकीय वरदहस्त असल्याने या घटनेची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी अशी मागणी होऊ लागली असल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात साधारण वीस वर्षांपूर्वी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी आपल्या संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तत्कालीन सरकारच्या धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात एक अशा ३९ सैनिकी शाळा सुरू करण्याच्या धोरणानुसार कोपरगाव तालुक्यात सैनिकी शाळा सुरू केली होती.मात्र नगर जिल्हा दोन बलाढ्य नेत्यांमुळे अपवाद ठरून नगर जिल्ह्यात प्रवरानगरसह दोन सैनिकी शाळांना परवानगी दिली होती.उद्देश जिल्ह्यात सैनिकी स्कुलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना सैनिकी स्कुलचे भोसला मिलिटरी स्कुलच्या धर्तीवर सर्वांग संपन्न शिक्षण मिळावे हा उदात्त हेतू होता.त्यासाठी विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय करण्यात येऊन या शाळा निवासी बनविण्यात आल्या होत्या.संकल्पित छायाचित्र.
इतर माहिती-
( महाराष्ट्रात ३९ सैनिकी शाळा आहेत.त्यांपैकी औरंगाबादची सैनिकी सेवापुर्व शिक्षण संस्था साताऱ्यातील सैनिक स्कूल आणि पुण्याची श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल (SSPMS) या अधिक प्रसिद्ध आहेत.३९ शाळांपैकी तीन कायम विनाअनुदित असून,पुण्यातली एक शाळा खासगी आहे. मुलींसाठी एकूण तीन सैनिकी शाळा आहेत. ३२ मुलांच्या शाळांना आणि तीन मुलींच्या शाळांना प्रत्येकी १ कोटी ८० लाख रुपये सरकारी अनुदान मिळते.१९९८पासून ते २०१९ सालार्यंत २०० कोटी रुपये अनुदान दिले गेले आहे.)
वर्तमानात या शाळा पालकांची सोय झाली की गैरसोय झाली हा वादाचा मुद्दा आहे.मात्र कोपरगाव तालुक्यातील ईशान्य गडाशी संबंधित सैनिकी स्कुल ही शाळा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.येथील निवासी शाळेत नाशिक जिल्ह्यातील सत्यगाव येथील रहिवासी असलेला विद्यार्थी सौरभ अण्णा सांगळे हा काल शाळेजवळच असलेल्या गारदा नदीतील बंधाऱ्यात मृत अवस्थेत आढळून आला आहे.ही घटना काल उघडकिस आली असून या ठिकाणी कोपरगाव येथील एका ठेकेदाराचे काम सुरू असून त्या ठिकाणी त्यांचा पर्यवेक्षक गुलाब हसन शेख रा.गजानन नगर कोपरगाव याला साठवण तलावात दि.२४ ऑगष्ट रोजी सायंकाळी ०६ वाजेच्या सुमारास एक अज्ञात मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळल्यावर त्याने शाळा व्यवस्थापनाच्या ही बाब लक्षात आणून दिली.शाळा व्यवस्थापनाचे प्राचार्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी दौलतराव जाधव यांच्या लक्षात आणून दिली आहे.घटणास्थळी तालुका पोलिसांनी धाव घेऊन त्याठिकाणी पंचनामा करून सदर विद्यार्थ्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला असता सदर विद्यार्थी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केला आहे.
दरम्यान या याबत पोलीस ठाण्याच्या समोर काल सकाळी हजर असलेल्या या संस्थेच्या प्राचार्यांना या प्रकरणी आमच्या प्रतिनिधीने चौकशी केली असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी खबर देणार पर्यवेक्षक गुलाब शेख यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यू नोंद दप्तर क्र.५०/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आंधळे हे करीत आहेत.