गुन्हे विषयक
अल्पवयीन मुली गायब होण्याचे प्रमाण वाढले,कोपरगाव पोलीस ठाण्यात तक्रारीं दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील आपली अल्पवयीन मुलगी अज्ञात ईसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेली असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात शिरसगाव येथील मुलीच्या पित्याने (वय-४५) दाखल केली आहे.यासह तालुक्यात बोलकी व शहाजापूर आदी ठिकाणी अशाच घटना घडल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
बदनामीमुळे माघार
मुलगी अचानक घरातून गायब झाल्याने घाबरलेले पालक पोलिसांत तक्रार करतात.अल्पवयीन असल्याने पोलिसही गुन्हा दाखल करून गांभीर्याने तपास करतात.मात्र आरोपी पकडल्यानंतर प्रेमप्रकरण समोर येते.पोलिस कारवाई आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे तरुण किंवा तरुणीचे आयुष्य आणि त्यांचे जीवन अधिक क्लिष्ट होते.तसेच बदनामी देखील होत असल्याने अशा प्रकरणांत अनेकदा पालकांकडूनच माघार घेतली जाते.त्यानुसार न्यायालयात समरी केल्याची अनेक उदाहरणे असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितली आहेत.
चोरी-दरोड्याप्रमाणे आता अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या वाढत्या घटना पालक आणि पोलिसांसाठी चिंतेची बाब ठरत आहेत.अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून,फूस लावून पळवून नेण्याच्या दररोज किमान चार घटना मुंबईत घडत आहेत.विशेष म्हणजे या अपहरणांमध्ये परिचयातील किंवा परिसरातील तरुणांचा समावेश सर्वाधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.खेळण्या-बागडण्याच्या,शिकण्याच्या वयातील कोवळी मुले-मुली प्रेमाच्या आकर्षणाला बळी पडत आहेत.टी.व्ही.मोबाईल आदींच्या प्रसाराचे काही दुष्परिणाम दिसत आहेत.कोवळ्या वयात घरून पळून जाण्याचे,संसार थाटण्याचे स्वप्न बघत असल्याचे प्रकार सर्रास घडू लागले आहेत.कोपरगाव तालुकाही त्याला अपवाद नाही.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथील ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.
कोपरगाव तालुक्यात अशा अन्य घटना घडल्या असून त्यात शहाजापूर येथील एक ४१ वर्षीय पालकाने व बोलकी येथील अशीच एक अल्पवयीन मुलगी गायब असल्याची फिर्यादी मुलीच्या पित्याने (वय-४१) दाखल केली आहे.यात नंतरच्या दोन मुली ५ मे तर बोलकी येथील मुलगी ४ मे रोजी गायब झाली आहे.यातील दोन मुली रात्री दीड ते दोनच्या सुमारास तर एक सकाळी गायब झाली आहे हे विशेष!या बातम्या मुलींच्या पालकांच्या चिंता वाढविणाऱ्या आहेत.त्यामुळे पालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी विविध तीन गुन्हे दाखल केले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए.आर.वाखुरे व ए.व्ही.गवसने हे करीत आहेत.