गुन्हे विषयक
महसूल मधील दोन जण लाच घेताना अटक,गुन्हा दाखल

युजसेवा
कोपरगाव (नानासाहेब जवरे)
कोपरगाव तहसील कार्यालयातील आरोपी लिपिक चंद्रकांत चांडे व योगेश पालवे यांनी १५ हजारांची लाच घेतल्याची घटना उघड होऊन अद्याप महिना उलटत नाही तोच काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कोपरगाव येथील आणखी एक तलाठी गणेश वैजनाथ सोनवणे व त्याचा सहकारी करण नारायण जगताप यांनी सदनिकांची नोंद करण्यासाठी ६ हजार ५०० रुपयांची लाच घेताना नगर येथील लाच लुचपत विभागाने जेरबंद केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे.त्यामुळे महसूल विभागात अद्याप बेबंदशाही सुरू असल्याचे उघड झाले असून त्यात कोणतीही सुधारणा झाली नसल्याचे दिसून येत नसल्याचे व त्यावर विद्यमान लोकप्रतिनिधी यांचे नियंत्रण नसल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान कोपरगाव पंचायत समितीत असेच प्रकार रोजगार हमीच्या विहिरी बाबत घडत असल्याचे माहिती हाती आली आहे.दुष्काळी शेतकऱ्यांना नडवले जात असल्याची माहिती आहे.याबाबत कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.अन्यथा त्यांचे प्रतिमा भंजन होण्यास वेळ लागणार नाही अशी नागरिकांत जोरदार चर्चा सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा विभाग मानला जातो.भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे.तेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ध्येय असल्याचे मानले जाते.शासन नागरिकांना अनेक सेवा पुरवित आहे.जर कोणत्याही शासकीय कामाकरीता शासकीय लोकसेवकांनी लाचेची मागणी केली तर नागरिकांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन हा विभाग वारंवार करतो.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सदैव अशा नागरिकांच्या बाजुने ठामपणे उभे राहिल आणि लाचखोरांविरूद्ध कारवाई करेल असा विश्वासही दिला जात असतो.भ्रष्टाचार मुक्त समाज राज्याला प्रगती,समृद्धी आणि सुशासनाच्या युगामध्ये घेऊन जाईल.असे म्हटले जात असले तरी त्यास कोपरगाव तालुका आणि त्याचे प्रशासन अपवाद मानले पाहिजे.कारण या ठिकाणी या पूर्वी एक तहसीलदार,तीन तलाठी,दोन कारकून आदींनी आपले प्रताप दाखवून आपली योग्यता सिद्ध केली असल्याचे तालुक्यातील प्रशासनावर कोणाचे नियंत्रण आहे ? असा सवाल निर्माण झाला आहे.वाळूचोर तर गंभीर समस्या बनली आहे.त्यात तर वरिष्ठ मंत्रीच सामील असल्याचे नागरिकांचे निरीक्षण आहे.कारण वळूचोर थेट मंत्र्यांचे व त्यांच्या दिवट्याचे फोटो आपले कार्यालयात लावून दररोज वाळूचोरी करत असल्याचे निरीक्षण आमच्या प्रतिनिधीने नोंदवले आहे.ते कमी की काय आता तलाठी यांनी सामान्य नागरिकांना आपल्या विशेष कार्याचा प्रताप दाखविण्यास सुरुवात केली असल्याचे उघड झाले आहे.
यातील तक्रारदार इसम (वय ३७) यांनी साई सिटी या ठिकाणी पदरमोड करून एक सदनिका (फ्लॅट) नुकतीच विकत घेतली होती.त्याची तलाठी कार्यालयात रीतसर नोंद करणे गरजेचे होते.त्यासाठी त्यांनी तहसीलदार कार्यालयाचे शेजारी असलेल्या कोपरगाव तलाठी कार्यालयात रीतसर अर्ज केला होता.पण सरळ काम करणार त्यांना तलाठी कोण म्हणणार असा बहुधा त्यांना प्रश्न पडत असावा.वर्तमान तलाठी गणेश सोनवणे याने त्यासाठी ०६ हजार ५०० रुपये देण्याची व आपले हात ओले करण्याची मागणी केली होती व त्यासाठी त्याने आपल्या हाताखाली असलेल्या झिरो तलाठी करण नारायण जगताप (वय-२३) दोघे रा.साईसिटी याचा वापर केल्याचे उघड झाले आहे.
त्यानंतर तक्रारदार यांनी अहील्यानगर येथील लाच लुचपत विभागाशी संपर्क साधला होता.व त्यांनी काल सकाळी हा सापळा लावला असता तलाठी यांचा पित्या या सापळ्यात अलगत अडकला आहे.त्याने सदर रक्कम मिळाल्यावर आपला आका असलेला तलाठी यास दूरध्वनी करून सदर रक्कम पोहचं झाली असल्याची गोड (?) बातमी त्याने दिली असल्याचे उघड झाले आहे.सदर रक्कम घेण्यासाठी त्यांनी साई रेसिडेन्सी इमारतीचे समोर असलेल्या पार्किंग समोर असलेली जागा काल सकाळी ११-१२ वाजेच्या सुमारास निवडली होती.त्यात लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण जगताप याने तलाठी गणेश सोनवणे यासाठी स्वीकारलेल्या ५०० रुपयांच्या १३ नोटा हस्तगत केल्या आहेत.
दरम्यान घटनास्थळी नगर येथील लाच लुचपत विभागाचे अपर पोलीस अधीक्षक अजित त्रिपुटे व कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आदींनी भेट दिली आहे.व शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रं.२/२०२५ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ (अ),१२ प्रमाणे आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस अधीक्षक अजित त्रीपुटे हे करीत आहेत.