गुन्हे विषयक
नोंदीवरून मारहाण,दोन अटक,एक दिवसांची पोलीस कोठडी !
न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत कार्यालयात,”तू, आमच्या वारस हक्काची नोंद का करत नाही,असा सवाल करत म्हणत ग्रामसेवक ज्ञानेश्वर देवराम सुर्वे यांना महेश गायकवाड व अन्य तीन जणांनी बेदम मारहाण करून जिवे मारण्याची नुकतीच धमकी देण्यात आल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पंचायत राज्यव्यवस्थेत ग्रामपंचायतीला महत्वपूर्ण स्थान आहे.ग्रामीण जनतेशी प्रत्यक्ष संपर्क साधणारी ‘लोकशाही संस्था’ असे तिचे स्वरुप असल्याने तिला पंचायतराज संस्थेचा पायाभूत घटक मानले जाते. ग्रामपातळीवर विकास कामांचा विचार करता,सरपंच सोबत ग्रामपंचायत अधिकारी यांना महत्वाची भूमिका बजावावी लागते.ग्रामपंचायत अधिकारी यांना ग्रामपंचायतीचा सचिव किंवा ग्रामविकास अधिकारी अशा नावांनी देखील ओळखले जाते.ते सरकार आणि ग्रामस्थ यांचे मधील दुवा म्हणून ओळखले जातात.मात्र बऱ्याच वेळा या घटकाबाबत गैरसमज होऊन प्रकरण हातघाईवर आल्याची अनेक उदाहरणे घडत असतात.यात अनेक ग्रामपंचायत अधिकारी अडवणुकीची भूमिका घेताना दिसत असतात मात्र सुर्वे यांची ओळख अशी नाही.ते प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात.मात्र त्यांच्यावर हल्ल्याची गंभीर घटना नुकतीच कोपरगाव शहराच्या पूर्वेस असलेल्या कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.
यातील फिर्यादी इसम ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर सुर्वे हे आपले नियत कर्तव्य करत असताना त्या ठिकाणी आरोपी महेश विजय गायकवाड,श्रीकांत विजय गायकवाड,विजय गायकवाड व महेश गायकवाड याची आई (सर्व रा.कोकमठाण) तेथे आले व त्यांनी सुर्वे यांना,”तू,आमचे वारस हक्काची नोंद का करत नाहीस ? अशी थेट विचारणा केली होती.त्यावर सुर्वे म्हणाले की,”तुम्ही न्यायालयातून कागदपत्रे बनवून आणा,मी तुमच्या वारसाची ग्रामपंचायत दप्तरी नोंद लावतो”याचा राग चौघांना आला,त्यांनी सुर्वे यांना ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर ओढत आणून मारहाण केली आहे.दरम्यान या घटनेत संशयित आरोपी महेश गायकवाड याने एक दगड सुर्वे यांच्या डोक्यात मारला असल्याची माहिती हाती आली आहे.तसेच काम न केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती हाती आली आहे.
दरम्यान या मारहाणीत ग्रामसवेक ज्ञानेश्वर सुर्वे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान यातील प्रमुख आरोपी महेश विजय गायकवाड,श्रीकांत विजय गायकवाड या दोघांना शहर पोलिसांनी काल सायंकाळी 07.30 वाजेच्या सुमारास अटक केली आहे.त्यांना आज कोपरगाव येथील मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांचेसमोर हजर केले असता सरकारी अभियोक्ता प्रदीप रणधीर यांनी अन्य दोन आरोपी अद्याप अटक करणे बाकी असल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणले होते व त्यांची सखोल चौकशीसाठी पोलिस कोठडीची मागणी केली होती.आरोपींच्या वतीने ऍड.नितीन गंगावणे यांनी बाजू मांडली होती.दरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर सुर्वे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील चार जणांविरूद्ध भा.न्या.संहिता कलम 132,118 (2),121 (2),115, 352, 351 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पवार करीत आहेत.