गुन्हे विषयक
शहरात गोळीबार,एक जखमी,आरोपी फरार ?
न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे )
कोपरगाव शहरात गोळीबार,एक जखमी,आरोपी फरार
कोपरगाव शहरात आज सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान स्वामी समर्थ केंद्राच्या समोर नवश्या गणपती जवळ अवैध रेशन घोटाळ्यातील दोन टोळ्यात गोळीबार झाला असून यात तन्वीर रंगरेज हा जखमी झाला असल्याची माहिती हाती आली असून त्यास छाती आणि कमरेस दोन गोळ्या लागल्या असून त्यावर आधी आत्मा मलिक व नंतर नाशिक येथील रुग्णालयात भरती करण्यासाठी रवानगी केली असल्याची धक्कादायक माहिती हाती आली असल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव शहरात अलीकडील काळात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे सामान्य माणसाला जीव मुठीत धरून जगण्याची नामुष्की ओढवली असल्याचे दिसून येत आहे.अशीच घटना सोमवार दिनांक 09 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास धारणगाव रोडवर उघड झाली होती.यातील आरोपी शाहरुख रज्जाक शेख,तौफिक सत्तार,जान महंमद मेमन,तन्वीर रंगरेज रा.सुभाषनगर,कोपरगाव आदी आपल्या चार चाकी गाडीतून आले व त्यांनी फिर्यादी नाजीम शेख यास मागील भांडणाच्या कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.शाहरुख शेख याने त्यास गावठी कट्टा दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती.यातील फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची साखळी बळजबरीने काढून नेली असा आरोप होता.त्यामुळे या आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.392/2024 भारतीय दंड संहिता सन-2023 चे कलम 119(1),115,(2),352,351(2),3(5),अवैध शस्त्र अधिनियम कलम 3(25) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र या प्रकरणी पोलिसांनी हे प्रकरण हलके घेतले असल्याचे दिसून आले असून त्याचा परिपाक आज सायंकाळी पाच वाजता दिसून आला आहे.यातील फिर्यादी आणि आरोपी यांचा काही नाजूक कारणावरून वाद असल्याची माहिती आहे.त्यावरून हे प्रकरण घडले होते.मात्र त्याला वेगळे रंग दिले असल्याची माहिती आहे.तो राग अद्याप शमलेले नाही हे आजच्या घटनेवरून पुन्हा एकदा उघड झाले आहे.
कोपरगाव शहरातील सुभाषनगर येथील तन्वीर रंगरेज व नजिम शेख यांच्या दोन टोळ्या अवैध रेशनसह अन्य व्यवसायात मध्ये कार्यरत आहे.त्यांच्यात वरचे वर भांडणे व हाणामारी होत असते.ती या महिन्याच्या प्रारंभी दिनांक 09 सप्टेंबर रोजी झाली होती.त्यात त्यांनी एकमेकाच्या विरुध्द गुन्हे दाखल केले होते.मात्र त्यानंतर हे प्रकरण शांत होईल असा पोलिसांचा अंदाज होता.मात्र त्याची धग अद्याप शांत झालेली नाही हे आज पुन्हा एकदा उघड झाले आहे.यातील आरोपी श्रीरामपूर येथील आरोपी मण्या बेग व त्याचे साथीदार आज सायंकाळी आले होते.व त्यांनी आपल्या मारुती स्विफ्ट गाडीतून तन्वीर रंगरेज याला हेरले व त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला असल्याची माहिती आहे.घटनास्थळ कोपरगाव शहर पोलिसांच्या अगदी समोर नाकाच्या खाली असून काही फुटांवर आहे हे विशेष !
दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेतली असून त्या ठिकाणी जखमी असलेला तन्वीर रंगरेज याला तातडीने उपचारार्थ आत्मा मलिक हॉस्पिटल येथे रुग्णवाहिकेतून भरती केले होते.मात्र त्यास दोन गोळ्या लागल्या असून एक कमरेच्या खाली खुब्या जवळ तर दुसरी छाती जवळ लागली असल्याची माहिती आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.पोलिस अधिकचा तपास करीत आहेत.शहर पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.