गुन्हे विषयक
कैद्यांत तुंबळ हाणामारी,एक जखमी,सहा जणांवर गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात अ.नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्त केल्या प्रकरणातील आरोपी दानिश शेरखां पठाण (वय-१९) याला कोपरगाव उपकारागृहात ठेवलेले असताना त्या बराकीतील आरोपी भैय्या उर्फ नयन शिंदे,भारत आव्हाड,अतुल आव्हाड,आकाश माकोने,विकी शिंदे आदींनी मारहाण करून मिशी कापण्याच्या कात्रीने गंभीर दुखापत केली असून सदर घटना न्यायालय अथवा पोलिसांना सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात वरील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी कारागृहातील पोलीस सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकताच मोठ्या प्रमाणावर गुटखा पकडला होता त्याचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.२०९/२०२४ भा.द.वि कलम ३२८,१८८,२७२,२७३,३४ अन्वये नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली करत असताना या गुंह्यातील आरोपी दानिश शेरखां पठाण याला पोलिसांनी अटक केली होती.व त्यास न्यायालयाने पोलीस सुनावली होती.त्यानंतर पोलिसांनी त्यास कोपरगाव येथील उपकारागृहात रवानगी केली होती.
दरम्यान तो दि.२६ एप्रिल रोजी रात्री कारागृहातील क्रं.०४ या खोलीत ठेवले असताना रात्री ०८ वाजेच्या सुमारास आरोपी भैया शिंदे व आकाश माकोणे यांच्यात आपापसात वाद सुरु होते.त्यावेळी माकोणे याने काही कारण नसताना फिर्यादी शेरखां पठाण यास शिवीगाळ करून धक्का दिला असल्याचा त्याचा आरोप आहे.त्यावरून फिर्यादी याने याबाबत आरोपीस विचारणा केली असता त्याचा राग येऊन फिर्यादी पठाण याने या बाबत त्यास जाब विचारला असता त्याचा आरोपी विशाल कोते यास राग आला व तो इतर आरोपीना म्हणाला की,”याला धरा हा जास्त माजला आहे” असे म्हणताच इतर आरोपीनी त्यास लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे.व कोते याने मिशी कापण्याच्या छोट्या कात्रीने त्याच्या उजव्या हातावर उजव्या पायावर मारून दुखापत केली आहे व फिर्यादीस म्हणाले की,”या घटनेबाबत,’ तू’ पोलीस अथवा न्यायालयात सांगितले तर तू परत कारागृहात आल्यावर तुला मारून टाकू” असा सज्जड दम दिला आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.२१२/२०२४ भा.द.वि.कलम १४३,१४७,१४९,३२४,३२३५०४,५०६ प्रमाणे ०६ आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.घटना स्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे आदींनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा हे करीत आहे.
दरम्यान वर्तमान स्थितीत कोपरगाव उपकारागृहात ७० हुन अधिक आरोपी चार बराकीत जनावरांसारखे कोंबले जात असून त्यामुळे ऐन उन्हाळ्यात आरोपींचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोंडमारा होत आहे.त्यातून त्यांच्यात चिडचिड होंणे,आरोपींना त्यातून विविध आजार होणे याचा प्रतिकूल सामना करावा लागत असून यातून कारागृह प्रशासन आणि पोलीस बदनाम होत असल्याची माहिती आहे.
दरम्यान राहाता येथें नवीन तहसील इमारतीत उपकारागृह तयार झालेले असल्याची माहिती मिळाली असून सर्वच जिल्हास्तरीय कार्यालये राहाता-शिर्डी येथे जात असताना उपकारागृहातील हा अतिरिक्त भार कधी कमी होणार असा सवाल आरोपींच्या नातेवाईकांनी विचारला आहे.