कोपरगाव तालुका
कोरोनाबाबत पंचायत समितीचे सतर्क राहण्याचे आवाहन

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोना व्हायरसच्या धास्तीमुळे भयभीत झालेल्या कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागामधील कोरोना व्हायरस बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तालुका गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांच्या मार्फत आवश्यक असणाऱ्या सर्व उपाय योजना राबविल्या जात असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमा जगधने यांनी आमच्या प्रातिनिधिशी बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य आबाधित रहावे यासाठी कोपरगाव पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीने नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. मात्र काही महिन्यांपूर्वी चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसने जगभरातील नागरिक घाबरून गेले आहेत.कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी आ. आशुतोष काळे हे देखील सहभागी झाले आहेत.
नागरिकांना कोरोना व्हायरसपासून दूर ठेवण्यासाठी सर्व गावांमध्ये स्वच्छतेच्या सूचना देणारे प्रचार फलक लावण्यात आले आहेत. या फलकावर वेळच्यावेळी साबणाने हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाने टाळने, गर्दीच्या ठिकाणी जाने आवश्यक असल्यास मास्कचा वापर करणे, सर्दी, ताप, खोकला आदी आजारांबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे, कोणत्याही अफवांना बळी पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील घराघरात जावून आशा सेविकांच्या माध्यमातून कोरोना व्हायरस बाबत माहिती व उपाय योजना व घ्यावयाची काळजी याबाबत पत्रके वाटण्यात आली आहेत. सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये आरोग्य शिक्षण देण्यात आले आहेत. बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांची आरोग्य पथकाने भेट घेवून त्यांच्या आरोग्याची माहिती घेतली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये. शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जगधने यांनी शेवटी केले आहे.