आरोग्य
म्युकरमायकोसिस बाबत मार्गदर्शनाचा उपक्रम कौतुकास्पद-कौतुक
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोना विषाणूमुळे अगोदरच संपूर्ण विश्व त्रस्त असतांना कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना म्युकरमायकोसिस हा आजार होत असल्याचे आढळून येत आहे. हा आजार सर्वच कोरोना बाधित रुग्णांना होणार नाही तरीदेखील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये त्यामुळे काहीसे काळजीचे वातावरण पसरत आहे. अशा परिस्थितीत श्री लाईफ हॉस्पिटलचे व्यवस्थापन म्युकरमायकोसिस या आजाराबाबत मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार घेवून उचलेले पाऊल अभिमानास्पद असल्याचे गौरवदगार आ. आशुतोष काळे यांनी काढले आहे.
आ.काळे यांनी नुकतीच श्री लाईफ हॉस्पिटलला भेट देवून पाहणी केली. ते म्हणाले की, मागील महिन्यापासून निर्माण झालेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत श्री लाईफ हॉस्पिटलने बाधित रुग्णांना चांगल्या प्रकारची सेवा दिली आहे व आता या म्युकरमायकोसिस आजारावर देखील श्री लाईफ हॉस्पिटल व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी मोफत तपासणी, मार्गदर्शन करून देण्याची तयारी दर्शविली आहे. नुकतीच म्युकरमायकोसीस व संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तालुका टास्कफोर्स समिती तयार करण्यात आली असून खाजगी डॉक्टरांची या समितीवर नियुक्ती करून त्यांना म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना मार्गदर्शन करावे असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला श्री लाईफ हॉस्पिटलने दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिस आजाराची मोफत तपासणी होवून रुग्णांची अडचण दूर होणार असून त्यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारे मोफत मार्गदर्शन देखील मिळणार आहे. तरी ज्या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस या आजाराची लक्षणे जाणवत असतील अशा रुग्णांनी या मोफत तपासणी सेवेचा लाभ घेवून पुढील उपचार तातडीने घ्यावेत असे आवाहन केले आहे. यावेळी डॉ. योगेश लाडे व डॉ. मयूर तीरमखे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.