विशेष दिन
समाज कल्याण विभाग उद्यापासून ‘समता पर्व’ साजरा करणार-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ‘संविधान दिन’ २६ नोव्हेंबर ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर २०२२ या कालावधीत ‘समता पर्व’ साजरे केले जाणार आहे.यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
दि.३० नोव्हेंबर रोजी ‘संविधान’ या विषयावर भिंतीपत्रक,पोस्टर्स,बॅनर इ.बाबत चित्रकला स्पर्धा व अनुसूचित जाती घटकासाठी कार्य करणारे समाजसेवी कार्यकर्ते,प्रतिनिधी,कर्मचारी यांची ‘अनुसूचित जाती उत्थान : दशा आणि दिशा’ या विषयावर कार्यशाळा घेतली जाणार आहे.
संविधान दिन २६ नोव्हेंबर पासून ‘समता पर्व’ उपक्रमास प्रभातफेरी व संविधान वाचनाने सुरूवात होणार आहे.२७ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा व महाविदयालये सर्व शासकीय वसतिगृहे,निवासी शाळा,समाजकार्य महाविदयालये,दिव्यांग शाळा,अनुदानित वसतिगृहे,शाहु-फुले-आंबेडकर निवासी-अनिवासी आश्रमशाळा,केंद्रीय आश्रमशाळांमध्ये निबंध स्पर्धा,प्रश्न मंजुषा,लेखी परीक्षा,वकृत्व स्पर्धा व इतर कार्यक्रम होणार आहेत.२८ नोव्हेंबर रोजी ‘संविधाना’वर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.२९ नोव्हेंबर रोजी पत्रकारांसाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबर रोजी ‘संविधान’ या विषयावर भिंतीपत्रक,पोस्टर्स,बॅनर इ. बाबत चित्रकला स्पर्धा व अनुसूचित जाती घटकासाठी कार्य करणारे समाजसेवी कार्यकर्ते,प्रतिनिधी,कर्मचारी यांची ‘अनुसूचित जाती उत्थान : दशा आणि दिशा’ या विषयावर कार्यशाळा घेतली जाणार आहे. १ डिसेंबर रोजी युवा गटाची कार्यशाळा,२ डिसेंबर रोजी अनूसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना भेटी, ३ डिसेंबर रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबिर,४ डिसेंबर रोजी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथीय यांच्यासाठी कार्यशाळा,५ डिसेंबर रोजी ‘ संविधान’ विषयावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
समता पर्वाचा समारोप भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर रोजी सामाजिक न्याय विभागाच्या लाभार्थ्यांना विविध लाभांचे वाटप,बक्षिस वितरणाने होणार आहे.समता पर्वाच्या २६ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या कार्यक्रमास राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे,जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला उपस्थित राहणार आहेत.
सर्व मागासवर्गीय संघटनांचे जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष,सामाजिक कायकर्ते तसेच सर्व नागरिकांनी समता पर्वामध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही शेवटी श्री.देवढे यांनी केले आहे.