कोपरगाव तालुका
संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक शुद्धीकरणाची गरज-डॉ.सबनीस

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वर्तमान समाजजीवनात मात्र सांस्कृतिक संघर्ष मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत.अशा भयावह परिस्थितीत सांस्कृतिक शुद्धीकरणाची गरज वैश्विक पातळीवर असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध समीक्षक,साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे.
“प्रत्येक व्यक्तीने विवेकवादी दृष्टीने संस्कृतीकडे पाहायला हवे.विश्व शांतीसाठी जागतिक पातळीवर वैश्विक भान आवश्यक असून समाज-संस्कृतीच्या शुध्दीकरण प्रक्रियेत बहुसांस्कृतिकीकरणाकडे सर्वांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे”-डॉ.रमेश सानप,प्राचार्य,श्री सदगुरु गंगागिरीजी महाराज महाविद्यालय.
कोपरगाव येथील श्री.सद्गुरू गंगागीर महाराज महाविद्यालयात मराठी विभागामार्फत ‘समाज- संस्कृतीचे शुध्दीकरण आणि विश्वशांती’ या विषयावरील एकदिवसीय आभासी प्रणालीद्वारे आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते त्यावेळी त्याचे उद्घाटन डॉ.श्रीपाल यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप होते.
सदर प्रसंगी महात्मा गांधी इन्स्टिट्यूट,मॉरिशस येथील माजी विभाग प्रमुख बिदन आबा व पी.ई.एस.कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स पोंडा-गोवा येथील डॉ.अनिता तिळवे, दुसऱ्या सत्रात अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील डॉ.ताहेर पठाण व औंध-पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील डॉ.धनंजय भिसे,कला विभागाचे उपप्राचार्य डॉ.सुभाष रणधीर,प्रा.संपत आहेर,प्रा.सुनील काकडे आदींसह राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक,संशोधक तसेच विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”भारताचा नकाशा विकृतीने भारलेला आहे.महापुरुषांची वाटणी धर्माच्या पातळीवर करीत त्यांची दुकानदारी मांडली जात आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान कोणत्याही धर्माचा टिळा लावत नसतांना संविधानाची मारेकरी बनत चाललेली व्यवस्था आक्रमक होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.धर्माच्या भिंती पाडून जगातील सर्व नागरिकांना एक होण्याचे आवाहन करीत विश्वसंस्कृती,विश्व नागरिकत्व प्रस्थापित होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप अध्यक्षीय विचार व्यक्त करतांना म्हणाले की,”प्रत्येक व्यक्तीने विवेकवादी दृष्टीने संस्कृतीकडे पाहायला हवे.विश्व शांतीसाठी जागतिक पातळीवर वैश्विक भान आवश्यक असून समाज-संस्कृतीच्या शुध्दीकरण प्रक्रियेत बहुसांस्कृतिकीकरणाकडे सर्वांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे.
सदर प्रसंगी महात्मा गांधी इन्स्टिट्यूट,मॉरिशस येथील माजी विभाग प्रमुख बिदन आबा व पी.ई.एस.कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स पोंडा-गोवा येथील डॉ.अनिता तिळवे, दुसऱ्या सत्रात अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील डॉ.ताहेर पठाण व औंध-पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील डॉ.धनंजय भिसे आदीनीं उपस्थिताना मार्गदर्शन केले आहे.
चर्चासत्राचा समारोप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.प्रभाकर देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.शिरीष लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी केले.सूत्रसंचलन डॉ.कैलास महाले यांनी केले तर प्रा.रावसाहेब दहे यांनी आभार मानले.