कोपरगाव तालुका
कोपरगावात कोरोनाचा रुग्ण नाही,उपाय योजनांची मात्र सक्ती जाहीर
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात कुठेही कोराणाचा रुग्ण नाही नागरिकांनी उगीच भीती बाळगू नये व अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतेच एका बैठकीत केले आहे.
दरम्यान आगामी पंधरा दिवस हे या आजाराचा प्रसार करण्यासाठी निर्णायक काळ असल्याने सर्वांनी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देताना आता आपली दुकाने विशेषतः हॉटेल्स,चहाच्या टपऱ्या,खाद्यपदार्थ,पेये विकणाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवावी.कारण त्यातूनच हा प्रसार जास्त वेगाने होऊ शकतो. कोणीही विनाकारण एकत्र येऊन,यात्रा,बाजार,जत्रा,लग्न तत्सम कार्य करण्याचे प्रसंग टाळावे.कोणी याचा भंग केला तर त्यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ हा दि.१३ मार्च पासून लागू केला आहे.त्यातील खंड २,३,४ मधील तरतुदी नुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. याचे जो पालन करणार नाही त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिला आहे.व सर्व दुकानदारांना तशा नोटिसा पाठवल्या असल्याची माहिती दिली आहे.
कोपरगाव नगरपरिषद हद्दीत कोरोना बाबत नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.वास्तविक कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असून तो हवेद्वारे पसरत असून त्यावर अद्याप उपाय सापडलेला नाही.कोरोना व्हायरस हा विषाणूंचा एक गट आहे. या व्हायरसमुळे सस्तन प्राण्यांना आणि पक्ष्यांना विविध रोग होतात. यांत गायींना व डुकरांना होणाऱ्या अतिसाराचा आणि कोंबड्यांना होणाऱ्या श्वसन रोगाचा समावेश आहे. या विषाणूचा प्रसार मानवांमध्ये श्वसन संसर्गाने होतो. हे संसर्ग बऱ्याचदा सौम्य, परंतु संभाव्य प्राणघातक असतात. कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करणारी लस किंवा रोग झाल्यास घ्यायची अँटिव्हायरल औषधे अजूनतरी (२०२० साल) उपलब्ध नाहीत.
कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते तहसिल कार्यालय येथिल फलकाचे अनावरण करतानाचे छायाचित्र.
कोपरगाव शहरातील नागरिकांचे आरोग्य आबाधित रहावे यासाठी कोपरगाव नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. मात्र काही महिन्यांपूर्वी चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसने जगभरातील नागरिक घाबरून गेले आहेत.कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी आ. आशुतोष काळे,नगराध्यक्ष विजय वहाडणे,उपनगराध्यक्ष योगेश बागुल,वैद्यकीय अधिकारी गायत्री कांडेकर,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे,आरोग्य सभापती अनिल आव्हाड, आगर व्यवस्थापक अभिजित चौधरी,शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचारी हे देखील सहभागी झाले आहेत.
भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा १४७ वर गेला आहे, तर तिघांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.राज्यात रुग्णांची संख्या ४२ वर पोहोचली असून पुण्यामध्ये आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. एकट्या पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १८ वर पोहोचली आहे.
नागरिकांना कोरोना व्हायरसपासून दूर ठेवण्यासाठी सर्व गावांमध्ये स्वच्छतेच्या सूचना देणारे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत. या फ्लेक्स बोर्डवर वेळच्यावेळी साबणाने हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाने टाळने, गर्दीच्या ठिकाणी जाने आवश्यक असल्यास मास्कचा वापर करणे, सर्दी, ताप, खोकला आदी आजारांबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे, कोणत्याही अफवांना बळी पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील घराघरात जावून आशा सेविकांच्या माध्यमातून कोरोना व्हायरस बाबत माहिती व उपाय योजना व घ्यावयाची काळजी याबाबत पत्रके वाटण्यात आली आहेत. सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये आरोग्य शिक्षण देण्यात आले आहेत. बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांची आरोग्य पथकाने भेट घेवून त्यांच्या आरोग्याची माहिती घेतली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये. शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे.स्वच्छता व बचाव हाच या प्रसंगी आपल्याला साथ रोखण्यापासून महत्वाची भूमिका ठरू शकतो.आज आपण या राष्ट्रीय कार्याला वाहून घेतले तरच अनेकांचे अमूल्य जीवन वाचवू शकतो.या बाबत एखाद्याची निष्काळजी हि आपल्यासाठी जीवघेणी ठरू शकते असे आवाहन अध्यक्ष वहाडणे यांनी नुकतेच आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले आहे.