कोपरगाव तालुका
मंजूर बंधाऱ्याचे शाश्वत व टिकाऊ काम करावे-आ. आशुतोष काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मंजूर बंधाऱ्याचे काम यापूर्वी निकृष्ट दर्जाचे झाल्याने गत वर्षीच्या महापुरात हा बंधारा पुन्हा तिसऱ्यांदा वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या बंधाऱ्याची दुरुस्ती करतांना पाटबंधारे विभागाने शाश्वत व टिकाऊ काम करावे असे आदेश कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कोपरगाव तालुक्यातील मंजूर, चास, हंडेवाडी, धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी, कारवाडी, वेळापूर, बक्तरपूर आदी गावातील शेती व शेतकरी यांचे भवितव्य अवलंबून असलेला बंधारा २०१९ च्या महापुरात वाहून गेला होता. त्यावेळी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांससह जमिनी वाहून जावून शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी आ.आशुतोष काळे यांनी या भागातील नागरिकांना मंजूर बंधाऱ्याची दुरुस्तीबाबत आश्वासन दिले होते. त्या आश्वासनांची पूर्तता करतांना आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या मंजूर बंधाऱ्याचा प्रश्न मांडला होता. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे नामदार जयंत पाटील यांनी ह्या प्रश्नाची गंभीर दखल घेत मंजूर बंधाऱ्याची दुरुस्तीबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची १८ फेब्रुवारी रोजी बैठक घेतली. या बैठकीत ना.जयंत पाटील यांनी मंजूर बंधाऱ्याची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले होते. त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच रविवार (दि.१मार्च) रोजी आ.आशुतोष काळे यांच्या समवेत बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी उत्तर महाराष्ट्र मुख्य अभियंता राहुल कुलकर्णी, नाशिक विभाग कार्यकारी अभियंता संगिता जगताप, सागर शिंदे, कार्यकारी अभियंता खोरगडे, उपविभागीय अभियंता महेश गायकवाड, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, पाटील, अधीक्षक अभियंता अरुण नाईक, आदी पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना आ. काळे म्हणाले की, मंजूर बंधारा वाहून गेल्यामुळे परिसरातील शेतकरी उध्वस्त झाले आहे. ज्यावेळी दोनवेळा हा बंधारा वाहून गेला त्यावेळी नागरिकांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने मंजूर बंधाऱ्याची दुरुस्ती करावी अशी मागणी केली होती. त्या मागणीचा सकारात्मकपणे विचार बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या गावांचे ठराव पाठवावे असे सांगितले होते परंतु दुर्दैवाने काही व्यक्तींना राजकीय श्रेय मिळणार नसल्यामुळे राजकीय द्वेषापोटी कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याला दुरुस्तीचे काम करू दिले नाही. त्यामुळे हा बंधारा त्यावेळी दुरुस्त होवू शकला नसल्याची खंत आ.काळे यांनी यावेळी व्यक्त केली. बंधाऱ्याचे दुरुस्तीबाबतचा पाहणी अहवाल लवकरात लवकर सादर करन बंधाऱ्याच्या कामाला लवकर सुरुवात होईल या दृष्टीने प्रयत्न करावे अशा सूचना केल्या.यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, पंचायत समिती सभापती अर्जुन काळे, माजी उपसभापती अनिल कदम, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानदेव मांजरे, अशोक तिरसे, सचिन चांदगुडे, विस्तार अधिकारी दत्तात्रय रानमाळ, उपविभागीय अभियंता कोपरगाव उत्तम पवार, पंचायत समिती शाखा अभियंता अश्विन वाघ, सरपंच सौ. उषाताई जामदार, सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.