कोपरगाव तालुका
मराठी भाषेत रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध-प्राचार्य डॉ.जगदाळे
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शेकडो वर्षांपासून मराठी भाषा समृद्ध व संपन्न असून भाषेवर प्रभुत्व निर्माण केल्यास रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत असलयाचे प्रतिपादन पुणे,चंदननगर येथील तुकाराम धोंडिबा पठारे महाविद्यालय येथे एका कार्यक्रमात बोलताना प्राचार्य डॉ.राहुल जगदाळे यांनी केले आहे.
“मराठी भाषा ही खूप जुनी असून ती कणखर व समृद्ध आहे.परंतु आपणच तिला आपल्या दैनदिन जीवनातून कमी करत आहोत किंबहुना उच्चभ्रू व्यक्तींचा भाषाविषयक ढोंगीपणा हा मराठीच्या विकासात अडसर ठरत आहे”-डॉ.सुभाष रणधीर,उपप्राचार्य,श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालय,कोपरगाव.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने शुक्रवार १४ जानेवारी ते शुक्रवार २८ जानेवारी २०२२ या कालावधीत “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” कोपरगाव येथील श्री सदगुरु गंगागीर महाराज महाविद्यालयात मराठी विभागा अंतर्गत मोठ्या उत्साहात ऑनलाईन आयोजित करण्यात आला होता त्यावेळी कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या कला विभागाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.सुभाष रणधीर हे होते.
सदर प्रसंगी सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप,प्रा.संपत आहेर,प्राध्यापक,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,”भाषा माणसामाणसांना जोडून त्यांच्यात आपुलकी निर्माण करते आणि माणसाच्या सर्वांगीण विकासास हातभार लावते.मराठी भाषा ही देवाणघेवाणीतूनच समृद्ध झाली आहे.मराठीतील समृद्ध साहित्य व्यक्तीच्या वैचारिक विकासास पोषक आहे.इतर भाषेतील शब्द मराठीत आल्याने मराठी अधिक समृद्ध बनली आहे.विद्यार्थ्यांनी मराठीतील मुलभूत भाषिक कौशल्य आत्मसात केल्यास तंत्रज्ञान युगातही अनेक रोजगाराच्या संधी प्राप्त होऊ शकतात असेही ते शेवटी म्हणाले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी केले.सूत्रसंचलन डॉ.कैलास महाले यांनी केले. प्रा.रावसाहेब दहे यांनी आभार मानले