कोपरगाव तालुका
गोदावरी कालव्यांना १९ फेब्रुवारीला सिंचनासाठी आवर्तन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
रब्बी पिकांना सिंचनाच्या पाण्याची मोठी ओढ निर्माण झालेली असताना रब्बी पिके धोक्यात अली असताना राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने गोदावरी कालव्यांना बुधवार दि.१९ फेब्रुवारी रोजी शेती आवर्तन देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांची नुकतीच दिली आहे.
जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा पाणीप्रश्न व त्यावरील उपाय योजनांबाबत विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आ. आशुतोष काळे यांनी गोदावरी कालाव्यांच्या लाभक्षेत्रात येत असलेल्या अडचणींकडे जलसंपदा मंत्र्यांचे लक्ष वेधले होते.
यावेळी आ. आशुतोष काळे यांनी पाणी प्रश्नाबाबत विविध मागण्या मांडताना ते म्हणाले की, गोदावरी कालव्यांचे आयुर्मान शंभर वर्षापेक्षा जास्त झाले आहे. त्यामुळे कालव्यांचे आवर्तन सुरु असतांना अनेकवेळा कालवा फुटीच्या घटना घडून लाखो लिटर पाणी वाया जावून आवर्तन विस्कळीत होवून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये गोदावरी कालव्याच्या नुतनीकरणासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद करावी तसेच गोदावरी नदीवरील मंजूर येथील कोल्हापूर टाईप बंधारा २०१९ च्या महापुरामध्ये वाहून गेल्यामुळे या बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या शेती व शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करावी अशा अनेक मागण्या कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. जयंत पाटील यांच्याकडे केल्या असून सर्वच मागण्यांना जलसंपदा मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून मंजूर बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यासाठी १ मार्च रोजी पाटबंधारे खात्याचे पथक तातडीने पाहणी करून जलसंपदा मंत्र्यांकडे अहवाल सादर करणार आहे अशी माहिती आ. काळे यांनी दिली आहे.
या बैठकीत आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे खाते आकारीत असलेल्या पाणीपट्टीकडे जलसंपदा मंत्र्यांचे लक्ष वेधतांना लाभधारक शेतकऱ्यांकडून आकारण्यात येणारी पाणीपट्टी पद्धत चूकीची असून शेतकरी केंद्रबिंदु ठेऊन पाणीपट्टी आकारण्यात यावी. तसेच शेतकरी केंद्रबिंदु ठेऊन पाणीपट्टी आकारण्याबाबत पुनर्विचार करण्यात यावा.उजनी चारी कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या.कालवा सल्लागार समितीची बैठक तालुका स्तरावर घेण्यात यावी. निळवंडे कालव्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण व्हावे यासाठी कामाचा वेग वाढवण्यात यावा. सिंचन सुविधा असल्याशिवाय कालव्याचे पाणी मिळणार नाही या धोरणावर पुनर्विचार करावा. लाभधारक क्षेत्रातील सर्वच शेतकऱ्यांना आवर्तनाचा लाभ मिळावा यासाठी शेतपाळी रजिस्टरवर शेतकऱ्यांच्या सह्या घेण्यात याव्या आदी मागण्या आ.काळे यांनी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. पाटील यांच्याकडे केल्या. या बैठकीत आ. आशुतोष काळे केलेल्या सर्वच मागण्या जलसंपदा मंत्र्यांनी विचारात घेवून कालवा नुतनीकरणासाठी ६०० कोटी निधिपैकी ३०० कोटी रूपयांचा निधी १०० कोटी रूपयांच्या ३ टप्प्यात मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना ना.पाटील यांनी दिल्या आहेत. पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून पाणीसाठा वाढवण्याबाबत तसेच निळवंडे कालव्यांचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढवण्याबाबत पाटील यांनी पाटबंधारे विभागला सूचना दिल्या आहे.या बैठकीसाठी पाटबंधारे विभगाचे कार्यकारी संचालक ए.बी. शिंदे, मुख्य अभियंता कुलकर्णी, अधिक्षक अभियंता अलका अहीरराव, नाईक, निळवंडे कालवा कार्यकारी अभियंता संघानी, गोदावरी कालवा कार्यकारी अभियंता सागर शिंदे, संगीता जगताप तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.