कोपरगाव तालुका
नगराध्यक्ष वहाडणे,आ.काळे यांच्या संयुक्त प्रयत्नातून तलावाचा पाणी प्रश्न लागणार मार्गी-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नावर अहंम ठरणाऱ्या पाच नं.साठवण तलाव व्हावा यासाठी सर्वप्रथम नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी संजय काळे,नितीन शिंदे यांचेसह ऑक्टोबर २०१८ मध्ये शिर्डी येथे समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या गायत्री कंपनी चे श्री.रेड्डी यांच्यासमवेत बैठक घेतली त्यामुळे या तलावाच्या कामास गती मिळाली असून विधानसभा निवडणुकीनंतर आ.काळे यांनी निर्णायक भूमिका घेतल्याने हा प्रश्न मार्गी लागल्याचें प्रतिपादन भाजपचे माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
“कोपरगाव शहर व तालुक्यासाठी पिण्याच्या व शेती सिंचनाच्या पाण्याची कृत्रिम टंचाई दर्शवली जाऊन नागरिकांना राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी वेठीस धरण्याची बाब लपून राहिलेली नाही मात्र नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी या अपप्रवृत्तीस फाटा देऊन पाच क्रमांकाच्या तलावाचा प्रश्न केंद्रीय मंत्री गडकरी यांनी भेटून मार्गी लावला त्यास नव्याने निवडून आलेले आ.आशुतोष काळेंसह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठबळ दिले आहे”-विनायक गायकवाड, माजी अध्यक्ष,कोपरगाव शहर भाजप.
कोपरगाव शहर व तालुक्यासाठी पिण्याच्या व शेती सिंचनाच्या पाण्याची कृत्रिम टंचाई दर्शवली जाऊन नागरिकांना राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी वेठीस धरण्याचे प्रयत्न लपून राहिलेले नाही.व त्यावर आपल्या मतपेट्या भरून आपली राजकीय पोळ्या भाजण्याचे पातक करण्याचा गलिच्छपणा कोपरगावच्या नागरिकांना नवीन नाही.त्यामुळे अनेक दशके या शहराला व तालुक्याला पाणी असूनही वेठीस धरण्याचे काम प्रामाणिकपणे सुरू आहे.त्यावर प्रश्नाला बगल देण्याऐवजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी सन-२०१६ नंतर अध्यक्षपदी आरूढ झाल्यावर प्रयत्न केले असून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचेकडे पाठपुरावा करून पाच क्रमांकाच्या तलावातून माती काढण्याचे आदेश संबंधित समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराला दिले होते.त्यातून हा तलाव आकारास येण्यास प्रारंभ झाला.त्या साठी माहिती अधिकार संजय काळे,नितीन शिंदे यांनी त्यांना साथ दिली असून या तलावाची पायाभरणी झाली होती.त्या नंतर कोपरगाव विधानसभेच्या निवडणुका २०१९च्या ऑक्टोबर महिन्यात संपन्न झाल्या व त्या नंतर या निवडणुकीत विजयी झालेले आ.आशुतोष काळे यांनी या प्रश्नांचा पाठपुरावा सुरू केला.राष्ट्रवादीचे नेते खा.शरद पवार यांनी या प्रश्नात आ.काळेच्या विनंतीला मान देऊन हा प्रश्न धसास लावण्यास सुरुवात केली.त्या नंतर अल्पावधीतच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिक विभाग यांचेकडून तांत्रिक मान्यता घेण्यात यश मिळाले.व गत सप्ताहात जलसंपदा विभागाने त्यास प्रशासकीय मान्यता दिल्याच्या बातम्या प्रस्तुत झाल्याने कोपरगाव करांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.या पार्श्वभूमीवर हे प्रसिद्धीपत्रक विनायक गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”त्यावेळी ना.नितीन गडकरी यांनी त्वरित हैदराबाद येथे फोनवर श्री.रेड्डी यांचेशी संपर्क करून पाच क्रमांकाच्या साठवण तलावाचे खोदकाम करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर नगराध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,अभियंता डिगंबर वाघ,अभियंता श्रीमती पाटील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या गायत्री कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत अनेक बैठका झाल्या.जमिनीतून माती-मुरूम-दगडाचे नमुने घेण्यात येऊन गायत्री कंपनीने खोदकाम करून माती-मुरूम वाहून न्यायला सुरुवातही केली.पण कोपरगावच्या दुर्दैवाने राजकिय अडथळे आणले गेल्याने काम मधेच थंडावले होते.
मात्र त्यानंतर २०१९ मध्ये आशुतोष काळे आमदार झाले व त्यांनी राज्य शासनातील संबंधांचा वापर करून पाच नं. साठवण तलावाच्या कामाला गती दिली.
नगराध्यक्ष विजय वहाडणे,अनुभवी व मुख्याधिकारी शांताराम गोसावी, यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संबंधित सर्व शासकिय विभाग-अधिकारी यांना सोबत घेऊन पाच नंबर साठवण तलाव कामाला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळवून दिली आहे.आता तर राज्य शासनाच्या प्रकल्प मान्यता समितीने १२३ कोटी रू. निधीलाही मान्यता दिल्याने,पाच नं.साठवण तलाव व जलवितरण योजना पूर्ण होणार याची नागरिकांना खात्री पटलेली आहे.नुकतेच आ.आशुतोष काळे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याचे कळविले आहे.काही निःस्वार्थ सामाजिक कार्यकर्त्यांनीही आपापल्या परीने यासाठी हातभार लावला हेही मान्य करावे लागेल.नगराध्यक्ष,मुख्याधिकारी व आमदार यांच्यात समन्वय असेल तर विकासकामे वेगाने होतात याचा अनुभव या निमित्ताने आला असल्याचेही गायकवाड यांनी शेवटी म्हटले आहे.