कोपरगाव तालुका
आपल्या विकासासाठी विवेक जागा ठेवणे गरजेचे-सौ.काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरंगाव (प्रतिनिधी)
समाजात चांगल्या व वाईट गोष्टी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत मात्र समाजातून नेमके काय घ्यायचे व काय सोडायचे याचा विवेक जागा ठेवणे याचेच नाव जीवन असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी अंजनापूर येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही गोष्टीला सीमारेषा नसते. प्रत्येक व्यक्ती संपूर्ण आयुष्यभर विद्यार्थीच असतो. स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्याने स्वतःचे कलागुण ओळखल्यास सहज यशस्वी होता येते- विमानतळाचे कार्यकारी संचालक-दीपक शास्त्री
पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व गौतमनगर कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे सुशीलामाई काळे महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबीराच्या समारोप प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना त्या बोलत होत्या. यावेळी शिर्डी विमानतळाचे कार्यकारी संचालक दीपक शास्त्री, सरपंच कांताबाई गव्हाणे,बापूसाहेब गव्हाणे, पर्बत गव्हाणे, चंद्रभान गव्हाणे, जगन्नाथ गव्हाणे, भास्कर गव्हाणे,बाबासाहेब गव्हाणे, प्राचार्या डॉ.विजया गुरसळ आदी मान्यवरांसह अंजनापूर ग्रामस्थ, प्राध्यापक, प्राध्यापिका, विंद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करीत असतांना आपण या समाजाचे व देशाचे काही देणं लागतो हि भावना डोळ्यापुढे ठेवावी. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ज्याप्रमाणे अंजनापूर ग्रामस्थांनी वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेऊन प्रेरणादायी गाव निर्माण केले आहे. त्याप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या सर्व शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी आपापल्या गावात वृक्षारोपण केल्यास आपले प्रत्येक गाव अंजनापूर होईल व त्यावेळी आदर्श कोपरगाव तालुका निर्माण होईल असा आशावाद व्यक्त करून शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी शिबीर काळात केलेले वृक्षारोपण, अंजनापूर गावातील सर्व रस्त्यांची केलेली स्वच्छता आदी उपक्रमांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी संतोष जाधव यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत प्राचार्या डॉ.विजया गुरसळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निर्मला कुलकर्णी व प्रा. उमाकांत कदम यांनी केले तर उपस्थितांचे आभार कार्यक्रम अधिकारी प्रा.विनोद मैंद यांनी मानले.