जाहिरात-9423439946
दळणवळण

…या रस्त्यातील खड्डे बुजेना,अपघात वाढले,प्रवासी त्रस्त !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा व शिर्डी व शनी शिंगणापूर या तिर्थक्षेत्रांना जाणाऱ्या भाविकांना सोयीचा ठरणारा अ.नगर-मनमाड या राष्ट्रीय (म्हणण्यापूरता) महामार्गाचे भाग्य अद्याप उजळले नसल्याने अनेकांना रस्त्याचे बळी ठरावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.मात्र उत्तर नगर जिल्ह्यातील नेते केवळ श्रेय वादात अडकले असून त्यांना जनतेच्या जीवितापेक्षा स्वतःच्या सत्तेच्या पोळ्या भाजण्याची पडली असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांनी या स्रेयवांद्याना दूषणे द्यायला सुरुवात केली आहे.

   

गत लोकसभा निवडणुकीत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे नगर दौऱ्यावर असताना कोपरगावच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीने नगर-मनमाड या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी
निवेदन दिले होते त्यावर त्यांनी या लोकप्रतिनिधीचा समाचार घेताना,”नगरच्या नेत्यांना मी काय सार्वजनिक बांधकाम विभागाचा इंजिनियर वाटलो काय ? असा तिखट सवाल केला होता.व माझ्याकडे किमान ५० हजार कोटी ते एक लाख कोटींची कामे आणायची सोडून हा काय रिकामटा उद्योग ? असा शालजोडा लगावला होता याचे स्मरण झाले आहे.

  “नगर-मनमाड हा रस्ता दक्षिण व उत्तर भारत यांना जोडणारा महत्वपूर्ण दुवा असून तो सर्व प्रथम तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी चौपदरी करण्याची सन-२००० साली घोषणा केली होती.मात्र त्याला सुरु होण्यासाठी तब्बल दहा वर्ष उलटली होती.त्यानंतर तो चौपदरी झाला मात्र त्या कामाची गुणवत्ता नीट नसल्याने तो लवकरच नादुरुस्त झाला असल्याचे वारंवार उघड झाले.त्यामुळे त्यावर लक्षणीय रित्या अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेक नागरिकांचे बळी गेले आहे.वित्तीय हानी वेगळीच आहे.त्याकडे सरकारच्या बांधकाम विभागाचे कायम दुर्लक्ष होत आहे.सदर रस्त्याचे रुपांतर सन-२०१६ साली राष्ट्रीय महामार्गात करण्यात आले आहे.नगर-मनमाड मार्गावरील शिर्डी साईसमाधी व शनी शिंगणापूर,नाशिक येथील देवस्थानला जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असल्याने हा राष्ट्रीय महामार्ग करण्याचे घाटले होते.केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडून जागतिक बँक प्रकल्प विभागाला तसा प्रस्ताव गेल्याचे सांगितले जाते.कल्याण रोडवरील नेप्तीजवळील बायपासपासून एमआयडीसीमार्गे विळद घाट व तेथून पुढे मनमाडपर्यंतचा हा नियोजित राष्ट्रीय महामार्ग केला आहे.त्यादृष्टीने केंद्रीय स्तरावर प्रक्रिया सुरू झाली असल्याचे तोंडभरून सांगितले गेले होते.भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या कार्यालयाकडून फेब्रुवारी २०२३ मध्ये नव्याने काम सुरु केले जाईल असे आश्वासन दिले गेले मात्र त्याला हरताळ फासला गेला आहे.

    राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अनिल गोरड यांनी सदर रस्ता दुरुस्तीचे काम करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असल्याची बतावणी केली होती.संबधित ठेकेदाराला काम चालू करण्याविषयी पत्रव्यवहार करण्यात येत असल्याचे जिल्हास्तरावरून सांगितले होते.परंतु राहुरीसह विविध आंदोलकांच्या मागणीचा विचारात घेता प्रथम प्राधान्य म्हणून विळद घाट ते सावळीविहीर पर्यंत ज्या ठिकाणी एकेरी वाहतूक आहे त्या ठिकाणी तात्काळ दुहेरी वाहतूक चालू करण्यासाठी काम चालू केले जाईल.त्यात प्रथम प्राधान्य म्हणून जोगेश्वरी आखाडा सूतगिरणीसमोर,राहुरी येथिल रस्त्याचे काम तात्काळ चालू करून दि.१० डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले होते त्याला त्यांनी कोलदांडा घातला आहे.एकेरी वळणाच्या ठिकाणी मार्गदर्शक सूचना दिल्या जात नाही.त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे.

   त्यासाठी जिल्हास्तरावर पालकमंत्र्याच्या उपस्थितीत बैठक होऊन अतिरिक्त १५ कोटी रुपये या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी त्वरित मंजूर करण्यात आले होते.त्याचे टेंडर होऊन पंधरा दिवसांमध्ये रस्ता मोटरेबल करण्याचे आदेश देखील देण्यात आले होते.तसेच पुढच्या दोन आठवड्यात नेमलेला ठेकेदार रुद्रानी अँड मनिषा इन्फ्रा या कंपनीने संपूर्ण रस्त्याचे काम त्वरित सुरू करावं अशा सूचना केल्या होत्या मात्र त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही हे विशेष !

   वर्तमानात अ.नगर-मनमाड हा रस्ता जनमाणसात केवळ टिंगलीचा विषय झाला आहे.त्यामुळे या मार्गावर शेकडो नागरिकांचे बळी गेले असून प्रवासी व अवजड वहानांचे मोठे नुकसान झाले आहे व होत आहे.त्यामुळे या मार्गावरील ठेकेदार आणि अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर दंडादात्मक कार्यवाही होणे गरजेचे बनले आहे.याप्रश्नी स्थानिक काँग्रेसी मात्र भाजपचा बुरखा घातलेल्या पुढाऱ्यांकडून कोणतीच अपेक्षा उरलेली नाही त्यामुळे भाजप निष्ठावान कार्यकर्ते आणि नेत्यांनी यात लक्ष घालणे गरजेचे बनले आहे.तरच वरिष्ठ भाजप नेते यात काही तरी करू शकतात अशी अपॆक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

   दरम्यान सावळीविहिर ते इंदोर या राष्ट्रीय महामार्गाची निविदा होऊन व त्याचे मोठे ढोल ताशे वाजवून उदघाटन केले गेले होते.त्यानंतर त्याचा कोणताही पाठपुरावा केलेला नाही त्यामुळे काम सुरू होऊन सहा महिन्यांच्यावर कालखंड लोटला आहे; सावळीविहिर,पुणतांबा फाटा,कोपरगाव बेट आदी ठिकाणचे पुलाचे सांगाडे वगळता काहीही प्रगती झाली नाही.पुणतांबा फाटा व कोपरगाव बेट येथील पर्यायी रस्त्यांची गुडघाभर खड्ड्यानी वाट लागली आहे.मात्र त्या कामासही इच्छित वेग आलेला नाही त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.आपण या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या कामास गती द्यावी अशी मागणीही राहाता,कोपरगाव तालुक्यातील प्रवासी व नागरिकांनी शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close