कोपरगाव तालुका
आत्मा मालिक एन.डी.ए. अॅकॅडमीमधून विद्यार्थ्यांना ७२ लाखांची प्रवेश शिष्यवृत्ती
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक एन.डी.ए. पुर्वतयारी अकॅडमीमार्फत दिनांक २२ डिसेंबर रोजी एन.डी.ए. पुर्वतयारी व इ.११ वी विज्ञान वर्गासाठी प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत एकूण ३८३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी २२२ विद्यार्थी पात्र झाले असून ते १ कोटी ९१ लाख ६० हजार एवढी शिष्यृवत्ती मिळविण्यास पात्र झाले आहेत. मात्र त्यापैकी ८० विद्यार्थ्यांना प्रथम टप्प्यात निवड करून त्यांना ७२ लाख एवढी प्रवेश शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ८० विद्यार्थ्याची निवड एन.डी.ए. पुर्वतयारी वर्गासाठी करण्यात आली आहे.
आत्मा मालिकमध्ये गेल्या दोन वर्षापासून एन.डी.ए. पुर्वयतारी करून घेतली जात आहे. सर्व सोयी सुविधायुक्त असणारी अकॅडमी म्हणून अल्पावधीतच आत्मा मालिक एन.डी.ए. अकॅडमी देशभरामध्ये प्रसिद्धीस आलेली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सैन्यदलात अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आत्मा मालिक एन.डी.ए. अकॅडमीचे प्रशिक्षीत व अनुभवी प्रशिक्षक चौदा तास विद्यार्थ्याच्या बरोबर मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतात. एस.एस.बी.चे प्रशिक्षण निवृत्त सैन्याधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पुर्ण केले जाते.
सन २०२०-२२ या शैक्षणिक कालावधीत आत्मा मालिक एन.डी.ए. अकॅडमीची तिसरी बॅच १ एप्रिल २०२० पासून सुरू होत आहे. त्याकरिता शैक्षणिक संकुलामध्ये प्रवेश पुर्व परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले होते. व त्यामधून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्याना प्रवेश शिष्यवृत्ती देण्याचे आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाने निश्चित केलेले होते. त्या अनुषंगाने प्रवेश परीक्षेत पात्र झालेल्या ८० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम रूपये ७२ लाख एवढी देण्यात आलेली आहे.
आत्मा मालिक एन.डी.ए. अकॅडमीमध्ये इयत्ता ११ वी विज्ञान सीबीएसई बोर्डसाठी १६० विद्यार्थ्याची क्षमता असून पुढील ८० विद्यार्थ्यासाठी प्रवेश परीक्षा दिनांक ५ जानेवारी व १२ जानेवारी २०२० रोजी होणार आहे. या दुस-या टप्प्यासाठी परीक्षेतून निवडल्या जाणा-या ८० विद्यार्थ्यांना प्रवेश शिष्यवृत्ती देण्यात येणार असून ती रूपये ८० हजार ते दीड लाखापर्यंत गुणवत्तेनुसार प्रतिविद्यार्थी देण्यात येणार आहे. परीक्षेसंबंधी संपूर्ण माहिती www.amnda.in या वेबसाईटवर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी अकॅडमीचे कमांडट मेजर भगत यांचेशी ९०११२३६७७९ या क्रमांकवर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.