कोपरगाव तालुका
गोदावरी कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधी द्या-आ.आशुतोष काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
निर्मितीच्या वेळी गोदावरी उजवा कालवा ६७७ क्युसेक्स व डावा कालवा ३७९ क्युसेक्स वेगाने वाहत होते मात्र आज शंभर वर्षांनी त्यांची काल मर्यादा संपली असून कालवे जीर्ण झाले आहेत त्याचा परिणाम गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेती सिंचनावर होत असून या गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी द्यावा,मागील पाच वर्षांपासून मुंबईला होणारी कालवा सल्लागार समितीची बैठक गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात घ्यावी अशा मागण्या आ. आशुतोष काळे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
गोदावरी कालव्यांच्या निर्मितीला जवळपास १०७ वर्ष झाली असून गोदावरी कालव्यांच्या निर्मितीपासून कालव्यांची दुरुस्ती झालेली नाही. मा.आ. अशोक काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात या कालव्यांची दुरुस्ती केली होती.मात्र मागील पाच वर्षात या गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गोदावरी कालव्यांची वहन क्षमता कमी झाल्यामुळे सिंचनासाठी शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने आवर्तन मिळत नाही. पर्यायाने शेतीच्या उत्पन्नावर दुष्परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
आ. काळे यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, नगर-नाशिकच्या जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांतील शेतकऱ्यांचा शेती सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी निर्माण केलेल्या कालव्यांची दूरावस्था झालेली आहे. दारणा धरणातील पाणी गोदावरी नदीद्वारे नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यात येऊन नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून उजव्या व डाव्या कालव्याच्या माध्यमातून गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते.उजवा कालवा नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्यापासून १२० किलोमीटरपर्यंत व डावा कालवा ९० किलोमीटरपर्यत वाहत आहे. १०७ वर्ष झालेल्या कालव्यांमध्ये झाडे-झुडुपांचे साम्राज्य वाढलेले आहे. या गोदावरी कालव्यांवरील छोटे पूल, एस्केप बंधारे, मोऱ्यांची बांधकामे मोडकळीस आलेली आहेत. कालवे ठिकठिकाणी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेती सिंचनावर होत असतो. या गोदावरी कालव्याच्या पाण्याच्या भरवशावर दोन सहकारी साखर कारखाने, छोटे-मोठे उद्योग, अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना व सिन्नर,निफाड, कोपरगाव, शिर्डी, राहाता या मोठ्या शहरांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन अवलंबून आहे.
कालवा सल्लागार समितीची बैठक गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात होत असे त्यामुळे या बैठकीला लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना उपस्थित राहता येत असे व आवर्तनाच्या नियोजनानुसार आपल्या शेतात मिळणाऱ्या आवर्तनानुसार पिकांचे नियोजन करता येत असे मात्र मागील पाच वर्षांपासून चुकीचा पायंडा पाडत लाभक्षेत्रात होणारी कालवा सल्लागार समितीची बैठक मुंबई येथे होत आहे त्यामुळे या बैठकीसाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना उपस्थित राहता येत नाही व आवर्तना संबंधी आपल्या अडचणी व प्रश्न मांडता येत नाहीत.
कालवे जीर्ण झाल्यामुळे कालवे फुटून आवर्तन विस्कळीत झाल्यास त्याचा परिणाम या शहरातील नागरिकांच्या पाणी पुरवठ्यावर होत असतो.
गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून कालवे दुरुस्तीच्या कामासाठी (४७०१) विस्तार व सुधार योजनेंतर्गत ५९७.२३ कोटींचा निधी मिळावा.२०१४ पर्यंत कालवा सल्लागार समितीची बैठक व आवर्तना संबंधी आपल्या अडचणी व प्रश्न मांडता येत नाहीत. मुंबई येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे एकदाही अंमलबजावणी झालेली नसून अडीच किलोमीटर पर्यंतच शेतकऱ्यांना पाणी देऊन पाटबंधारे खात्याने धन्यता मानली आहे.त्यावेळी दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत असे.त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या अडचणी मांडण्यासाठी यापुढे ही बैठक गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात घ्यावी तसेच मागील काही वर्षांपासून कोरडा दुष्काळ व यावर्षी ओल्या दुष्काळाने शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे वाढीव पाणीपट्टी धोरणाबाबत पुनर्विचार व्हावा आदी मागण्या आ.आशुतोष काळे यांनी जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.