जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगांव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली-आरोप

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

मागील जून ते ऑक्टोंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील खरीप पिकांचे व फळबागांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झालेले असताना कोपरगांव तालुक्यासाठी केवळ ५० लाख ४२ हजाराचा निधी उपलब्ध झाल्याचे समजते हा निधी तुटपुंजा असून ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची घोर निराशा करणारा असून शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली असल्याचा आरोप नगर जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी नुकताच एका प्रसिद्धी पत्रकान्वये केला आहे.

“राज्य शासनाने नुकसान भरपाईपोटी राज्यातील शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर केलेले आहे.त्यातून अहमदनगर जिल्ह्यासाठी १० कोटीचा नाममात्र निधी उपलब्ध झाला आहे.या निधीमधून कोपरगांव तालुक्याच्या वाट्याला फक्त ५० लाख ४२ हजाराचा निधी उपलब्ध झाल्याचे समजते.तालुक्यातील शेती नुकसानीचा विचार करता हा निधी अतिशय तुटपुंजा आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जाणार आहे”-राजेश परजणे,जि.प.सदस्य.

आपल्या प्रसिद्धी पत्रकात परजणे यांनी पुढे म्हटलं आहे की,”यासंदर्भात कोपरगांवचे तहसीलदार विजय बोरुडे यांना दिलेल्या निवेदनातून तालुक्यातील शेती पिकांच्या नुकसानीबाबतची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येऊन निधी उपलब्ध झाला असल्याचे शासकीय यंत्रणा सांगते परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात अद्याप काहीच पडले नाही.त्यातच रविवारी दि.१७ ऑक्टोंबर रोजी कोपरगांव तालुक्याला परतीच्या पावसाने पुन्हा झोडपल्याने शेतकऱ्यांच्या हातातून होते नव्हते ते सर्व गेले आहे. शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून शासनाने पुन्हा पंचनामे करण्यात वेळ घालवण्यापेक्षा शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देणेच योग्य ठरेल. जून ते ऑक्टोंबर या कालावधीत अतिवृष्टी व पुराने कोपरगांव तालुक्यात मोठा फटका बसला आहे.उभ्या पिकांसह जमिनी पाण्याखाली गेल्याने शिवारे जलमय झाली होती. काढणीला आलेल्या सोयाबीन,मका,कापूस,बाजरी,तूर,उडीद,मूग, भूईमूग पिकांना मोठा फटका बसला होता.अनेक शेतातल्या केळी,डाळींब,पपई,चिक्कू,पेरुच्या बागांचे नुकसान झाले होते.भाजीपाला पिके अक्षरश: सडून गेल्याने शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले आहे.
मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला असताना बऱ्याच शेतकऱ्यंना अद्याप विम्याचे पैसे मिळालेले नाहीत.मागील वर्षीच्या नुकसान झालेल्या पिकांचीही भरपाई अद्याप मिळालेली नाही.त्यातच रविवारी कोपरगांव तालुक्यात सर्वदूर परतीचा पाऊस झाला.या पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन,वेचणीला आलेला कापूस,चारा पिके पुन्हा जमीनदोस्त झाली आहेत.

कोपरगांव तालुक्यातील ९९९ शेतकऱ्यांच्या ३५८ हेक्टर क्षेत्राचाच नुकसानीमध्ये समावेश असल्याने अनेक शेतकरी यातून वंचित राहणार आहेत.दिवाळीचा सण पंधरा दिवसावर आल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. पुढील रब्बी हंगामासाठी बियाणे खरेदी व कृषी औजारांची जमवाजमव करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने दूध धंदा अडचणीत आला आहे.परिणामी शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने या परिस्थितीचा गांभिर्याने विचार करुन संकटात सापडलेल्या नुकसानग्रस्त सर्वच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची नितांत गरज आहे.अन्यथा शेतकरी आणि शेती उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही.

रविवारी कोपरगांव तालुक्यात झालेल्या शेती व चारा पिकांचे,फळबागांचे प्रचंड नुकसान झालेले असून शासनाने आता पुन्हा पंचनामे करण्यात वेळ घालविण्याऐवजी सरसकट नुकसान भरपाई जाहीर करुन शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी लाभ मिळवून द्यावा अशी मागणीही परजणे यांनी शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close