कोपरगाव तालुका
कोपरगावात ११ विद्यार्थ्यांची स्थानिक मुलाखतीत निवड
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील
के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि एन. आय. आय. टी. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आय. सी.आय.सी. आय या बँकेसाठी घेतलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये महाविद्यालयाच्या एकूण ११ विद्यार्थी-विद्यार्थिनींची निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी येथे दिली.
प्राचार्य डॉ. बी. एस. यादव पुढे म्हणाले की, “आमच्या महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अंतर्गत सोमवार , दिनांक २७ व २८ सप्टेंबर, २०२१ रोजी या कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी दिलेल्या पूर्वसूचनेनुसार ४४ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी ११ विद्यार्थ्यांची आय. सी.आय.सी. आय बँकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुलाखातींद्वारे अंतिम निवड केली. एन. आय. आय. टी. तर्फे श्री शिवम सिंग, पायल वलेसरा व श्री सागर गीत या अधिकाऱ्यांनी मुलाखाती घेतल्या. “महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अंतर्गत वर्षभर विविध कंपन्यांच्या सहकार्याने कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात येत असते. यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांना अशा प्रकारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत,” असेही डॉ. यादव म्हणाले. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव. ऍड. संजीव कुलकर्णी व सदस्य मा. संदीप रोहमारे यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना एन. आय. आय. टी. मुंबई मार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांसाठी खाजगी बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी सातत्याने उपलब्ध करून देणारे के.जे.सोमैया महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय आहे अशी माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स सेलचे प्रमुख डॉ. संतोष पगारे यांनी दिली. कॅम्पस इंटरव्ह्यूच्या यशस्वीतेसाठी प्रा. व्ही. सी. ठाणगे, डॉ. जी. के. चव्हाण, डॉ.एन. टी. ढोकळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे पालन करून या मुलाखती संपन्न झाल्या, अशी माहिती कार्यालय अधीक्षक डॉ. अभिजित नाईकवाडे यांनी दिली.