कोपरगाव तालुका
धाडसी चिमुकल्यास स्नेहलता शिंदे यांनी दिली शाबासकीची थाप
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव मतदार संघातील राहाता तालुक्यातील वाकडी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या रविंद्र जाधव या विद्यार्थ्याने प्रसंगावधान राखत जीवाची बाजी लावून आपल्या आईचे प्राण वाचविल्याची घटना नुकतीच वाकडी येथे घडली होती. या विद्यार्थ्याची स्नेहलता शिंदे यांनी नुकतीच त्याच्या शाळेत जावून त्याची भेट घेतली व त्याने दाखविलेल्या धाडसाबद्दल त्याचे कौतुक केले आहे.
शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असतांना या देशाचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी अपार मेहनत घेत असतात.विद्यार्थ्यांना बौद्धिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान व वेळप्रसंगी आलेल्या संकटाचा मुकाबला कसा करायचा याचेही धडे विद्यार्थ्यांना देत असतात.त्यातूनच रवींद्र जाधव घडत असतात.
शिक्षकांनी दिलेल्या याच सर्वांगीण ज्ञानातून वाकडी येथील रविंद्र जाधव या विद्यार्थ्याने विजेचा धक्का बसलेल्या आपल्या आईला मृत्युच्या दाढेतून परत आणले आहे. या विद्यार्थ्यावर राहाता, कोपरगाव तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत असून या विद्यार्थ्याची स्नेहलता शिंदे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी रविंद्र जाधव या विद्यार्थ्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या आईच्या तब्बेतीची चौकशी करून कुटुंबाची आपुलकीने माहिती जाणून घेत रविंद्र जाधव या विद्यार्थ्याच्या शिक्षकांचे देखील त्यांनी कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थीही किती हुशार व धाडसी असतात याचा प्रत्यय या घटनेतून दिसून येत असल्याचे स्नेहलता शिंदे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी रविंद्र जाधवचे वर्ग शिक्षक राजेंद्र बनसोडे, अनिल कोते, सुरेश लहारे, आण्णासाहेब कोते, आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.



