कोपरगाव तालुका
कचेश्वर देवस्थानच्या दुरुस्तीसाठी निधी द्या-आ. आशुतोष काळेंची मागणी
संपादक -नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव शहरातील बेट भागातील दैत्य गुरु शुक्राचार्य व कचेश्वर देवस्थान हे प्राचीन देवस्थान असून ऐतिहासिक, पौराणिक असलेले हे देवस्थान प्रती त्र्यंबकेश्वर म्हणून या देवस्थानची ख्याती आहे. १ नोव्हेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील व कचेश्वर देवस्थानच्या दक्षिणेकडील जवळपास एकशे पन्नास फुट लांबीची भिंत कोसळली आहे त्यामुळे संपूर्ण देवस्थानची अतिशय दुरावस्था झाली असून या देवस्थानच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी द्यावा अशी मागणी पुरातत्व विभागाला दिलेल्या पत्रात आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच केली आहे.
कोपरगाव बेट येथे दैत्यगुरु शुक्राचार्य व त्यांचा शिष्य कच व शुक्राचार्यांची कन्या यांची प्रेमकथा आकाराला आली होती येथेच शुक्राचार्यांकडून कचाने देव-दानव युद्धात ठार झालेल्या देवांना जिवंत करण्यासाठी संजीवनी विद्या मिळवली होती व देवकुळ वाचविण्यास मोठा हातभार लावा होता.संजीवनी पार आजही येथे आपल्याला दिसतो.या प्राचीन वारसा आता नष्ट होण्याच्या मार्गावर असून याला उर्जितावस्था आणणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.
दिलेल्या पत्रात आ. आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, दैत्य गुरु शुक्राचार्य व त्यांची मुलगी देवयानी यांची ख्याती संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. या दैत्य गुरु शुक्राचार्यांचे कोपरगाव शहराच्या बेट भागात भव्य प्राचीन मंदिर आहे. वर्षभर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी श्रावण महिना, महाशिवरात्र या पुण्य काळात भाविकांची मांदीयाळी असते. मात्र काही वर्षापासून या तीर्थक्षेत्राकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे या तीर्थक्षेत्राची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. काही वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टीत या देवस्थानच्या पूर्वेकडील दरवाजाची बाजू पूर्णपणे पडलेली असून एक नोव्हेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे या देवस्थानच्या दक्षिणेकडील भिंत कोसळल्यामुळे या ऐतिहासिक देवस्थानाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या पुरातन व ऐतिहासिक देवस्थानाविषयी भाविकांची असलेली श्रद्धा व देवस्थानची झालेली दुरावस्था याची आपण गांभिर्याने दखल घेवून या देवस्थानच्या दुरुस्तीसाठी मोठा निधी उपलब्ध करून द्याबा अशी मागणी दिलेल्या पत्रात आ.आशुतोष काळे यांनी शेवटी केली आहे.