कोपरगाव तालुका
कोपरगावात समाज कल्याण विभागाच्या विविध साहित्याचे वाटप

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांचे साहित्य लाभार्थ्यांना नुकतेच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते नुकतेच मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आले आहे.त्यावेळी लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
“मागील चार वर्षाच्या कार्यकाळात ग्रामीण भागात शाळा खोल्या,अंगणवाडी इमारत,ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, मुस्लीम कब्रस्थान,स्मशानभूमी,समाज मंदिर,प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामपंचायत कार्यालय आदि कामांसाठी कोट्यावधी रुपयांच्या मिळालेल्या निधीतून ग्रामीण भागातील बहुतांशी विकासाचे प्रश्न मार्गी लागले आहेत”-आ.आशुतोष काळे.
राज्यातील दुर्बल घटकांची विशेष काळजी पुर्वक शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन करण्यासाठी तसेच सामाजिक अन्याय यापासून त्याचे संरक्षण करण्याच्या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने समाज कल्याण विभागाची निर्मिती केली.या विभागाद्वारे तळागाळातील गावपातळी पर्यतच्या अनुसूचित जाती-जमाती,भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग,अपंग व दुर्बल इ. घटकांना शैक्षणिक,आर्थिक,सामाजिक, वैयक्तिक व कौटुंबिक लाभाच्या योजनांचा लाभ घेता यावा जेणेकरून त्याचे जीवनमान उंचविता येईल व त्यांना सर्व सोयी-सुविधांचा लाभ घेता येईल.यासाठी समाज कल्याण विभाग सतत कार्यरत असतो.कोपरगावात या विभागामार्फत विविध साहित्याचे वाटप आ.काळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.सदर प्रसंगी वारी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सोनाली साबळे यांच्या समाज कल्याण विभागाच्या निधीतून विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,जिल्हा परिषद सदस्या सोनाली साबळे,पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,दाणे पाटील,रोहिदास होन,राहुल रोहमारे,जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,गोदावरी खोरेचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे,अविनाश निकम,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी व लाभार्थी उपस्थित होते.
सदर प्रसंगी आ.काळे म्हणाले की,”मागील चार वर्षाच्या कार्यकाळात ग्रामीण भागात शाळा खोल्या,अंगणवाडी इमारत,ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, मुस्लीम कब्रस्थान,स्मशानभूमी,समाज मंदिर,प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामपंचायत कार्यालय आदि कामांसाठी कोट्यावधी रुपयांच्या मिळालेल्या निधीतून ग्रामीण भागातील बहुतांशी विकासाचे प्रश्न मार्गी लागले आहेत. हे प्रश्न मार्गी लागत असतांना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांनी केलेला पाठपुरावा उल्लेखनीय असून जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे आ.काळे यांनी सांगितले. यावेळी २० टक्के सेस फंडातून २०२०-२१ या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती,जमाती व इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी २५ कडबा कुट्टी मशीन, १६ इलेक्ट्रिक मोटार, ४५ शिलाई मशीन यासाठी एकूण ११ लाख ३१ हजार तसेच ५ टक्के सेस फंडातून अपंग लाभार्थ्यांसाठी १४ दिव्यांग व्यक्तींना स्वयं रोजगारासाठी पिठाच्या गिरणीसाठी प्रत्येकी १३,हजार याप्रमाणे १ लाख ८१ हजार ,लघु उद्योगासाठी १० व्यक्तींना प्रोत्साहनपर अनुदान प्रत्येकी २०हजार याप्रमाणे एकूण २ लाख, औषध उपचारासाठी ११ व्यक्तींना प्रत्येकी २०,हजार याप्रमाणे २ लाख २० हजार व बहु विकलांग व्यक्तींच्या ११ पालकांना प्रत्येकी २०,हजार याप्रमाणे २ लाख २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य तसेच महिला बालकल्याण विभागांतर्गत ४५ विद्यार्थिनींना १ लाख ८० हजारांच्या सायकल वाटप करण्यात येऊन असा एकूण २१ लाख १३ हजार रुपयांचे साहित्य वाटप आ.काळे यांच्या हस्ते करण्यात आले.