कोपरगाव तालुका
शिर्डी संस्थान विश्वस्त मंडळ निवड,…आणि न्यायालय हसले !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
देशभरात प्रसिद्ध असलेल्या शिर्डी साई संस्थान आणि पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या विश्वस्तपदी कुणाची वर्णी लागणार या बाबत गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन लढ्यानंतर तर्कवितर्क सुरु असताना काल विविध माध्यमात कोपरगावचे राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे असल्याची माहिती उपलब्ध झाली असताना आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली असता याचिकाकर्त्यांच्या वकिलाने अद्याप निवड झालेली नसताना काही नेत्यांनी बॅनरबाजी व फटाके फोडल्याची न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले असता न्यायालयाला हसू आवरले नाही त्यामुळे विश्वस्त निवडीचे हे नाटक चांगलेच रंगात आल्याची चर्चा देशभरात सुरु झाली आहे.
दरम्यान या निवडी बाबत कार्यवाही अंतिम टप्यात असून आगामी पंधरा दिवसात न्यायालयाला ती सुपूर्त केली जाईल असे आश्वासन देऊन राज्य सरकारने न्यायालयाकडे पंधरा दिवसांची मुदतवाढ मागून घेतली असून न्यायालयाने ती दिली असल्याची माहिती अड्.अजिंक्य काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे या “जाहीर न झालेल्या यादीच्या उत्सवावर” देशभर उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
राज्यातील महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक आज मुंबईत पार पडली होती.देशविदेशातील साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीतील साईबाबा आणि पंढऱपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानच्या विश्वस्तपदावर वर्णी लागण्यासाठी राजकीय मंडळींकडून प्रयत्न सुरु होते.अखेर काल या संस्थानचे विश्वस्तपद,अध्यक्षपदाच्या संदर्भात निर्णय झाला असल्याच्या बातम्या विविध वृत्त संस्थांनी प्रसिद्ध केल्या होत्या त्यात अध्यक्षपदी कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्ष पदी शिवसेनेचे नेते नेर्लेकर तर विश्वस्तपदी डॉ.एकनाथ गोंदकर,संदीप वर्पे,संग्राम कोते,अनुराधा आदिक,अजित कदम,पांडुरंग अभंग,सुरेश वाबळे आदी सोळा विश्वस्तांची यादी अनाधिकृत जाहीर झाली होती.त्याला सरकारी पातळीवर दुजोरा मिळाला नव्हता.त्या नंतर इच्छुक पदाधिकारी व विश्वस्त यांच्या कार्यकार्त्यानी फटाके फोडले होते.तर काहींनी शहरात बॅनर लावले होते.त्याबाबत आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली असता त्या याचिकेतील वकील अजिंक्य काळे यांनी न्यायालयाच्या हि बाब लक्षात आणून दिली असता न्यायालय हसायला लागले व या (वेडाचाराला) मी काय करू शकतो ? असा सवाल विचारला आहे.
याचिकाकर्ते यांच्या वतीने आज २३.०६.२०२१ मा. न्यायालयाच्या असे निदर्शनास आणून दिले कि, काही राजकीय व्यक्तीचे नावे सामाजिक माध्यमांवर विश्वस्थ म्हणून निवड झाल्याचे फिरत आहे. त्यावर मुख्य सरकारी वकील, श्री. डी आर काळे यांनी, विश्वस्थ मंडळ नेमण्यासंधार्बत काल बैठक झाली असून, विश्वस्थ मंडळ नियुक्ती संधर्बात अधिसूचना जाहीर करण्यासाठी अंतिम २ आठवड्याची मुदतवाढ मागितली.
त्यावर उच्च न्यायायालयाचे न्या.एस.व्ही.गंगापूरवाला व न्या.एम.जी.सेवलीकर यांनी सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीची नोंद घेत साईबाबा संस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळ नियुक्तीसंधार्बत अधिसूचना जाहीर कारणासाठी राज्य शासनास २ आठवड्याची मुदतवाढ दिली आहे.
सदर प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. प्रज्ञा तळेकर व अजिंक्य काळे यांनी काम पाहिले तर शासनाच्या वतीने ऍड.डी.आर.काळे, यांनी काम पाहिले. पुढील सुनावणी ५ जूलै रोजी ठेवण्यात आली आहे.
दरम्यान या निवडी बाबत कार्यवाही अंतिम टप्यात असून आगामी पंधरा दिवसात न्यायालयाला ती सुपूर्त केली जाईल असे आश्वासन देऊन राज्य सरकारने न्यायालयाकडे पंधरा दिवसांची मुदतवाढ मागून घेतली असून न्यायालयाने ती दिली असल्याची माहिती अड्.अजिंक्य काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे या “जाहीर न झालेल्या यादीच्या उत्सवावर” देशभर उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारने सतरा पैकी सोळा विश्वस्तांची नावे निश्चित केली असून केवळ शिवसेनेची एक जागा निश्चित होण्याची बाकी असल्याची माहिती मिळाली आहे.