कोपरगाव तालुका
कर्म सेवामय झाले की,जगण्याची सार्थकता होते-ह.भ.प.इंदुरीकर
न्यूजसेवा
संवत्सर-(शिवाजी गायकवाड)
मानवी जीवनाची सार्थकता ही आयुष्यभर जपलेल्या मूल्यांवर अवलंबून असते.कर्म सेवामय झाले की,जीवन कृतार्थ होते आणि जीवन कृतार्थ झाले की, जगण्याची सार्थकता होते असे विचार प्रसिध्द समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर ) यांनी व्यक्त केले आहे.
“मुलींच्या शिक्षणासाठी परजणे यांनी घेतलेल्या ध्यासाची आज पूर्तता झालेली आहे.संवत्सर परिसरात आण्णांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला आहे.अनेक मुलींची शिक्षणाची येथे सोय झाल्याने अडचणी दूर झाल्या आहेत.गोदावरी दूध संघाच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना आधार मिळवून दिला आहे”-राधाकृष्ण विखे,माजी मंत्री
गोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक,दिवंगत नेते नामदेवराव परजणे यांच्या सतराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त संवत्सर येथे आयोजित प्रवचनातून मार्गदर्शन करताना ह.भ.प.इंदुरीकर बोलत होते.राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आ.राधाकृष्ण विखे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,गोदावरी दूध संघाचे संचालक राजेंद्र जाधव,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”सारखा दुःखाचाच विचार करणारा माणूस निराशावादी बनतो.तर सदैव सुखाचाच विचार करणारा माणूस चंगळवादी होतो.चंगळवादाच्या अतिरेकातून जन्माला येणारे दुःख माणसाला व्यसनांचा गुलाम करते त्यामुळे आधीच भविष्याचा विचार करुन वाटचाल केली तर वाट्याला येणारे छोटे सुखही जगणे सोपे करुन जाते असे सांगून पुढे ते म्हणाले की,आयुष्यात जबाबदारी स्वीकारणारी माणसे एकतर जिंकतात आणि नाही जिंकली तरी त्यातून काहितरी शिकतात.माणसाचे मन हे चंचल आहे.चंचल मनाला कोणत्याही ध्येयात गुंतवले तर ते मन इंद्रीयाच्या आहारी जात नाही. सगळेच निर्णय मनाने घेऊ नका काही निर्णय बुध्दीला घेऊ द्या.मनाचे निर्णय अनेकवेळा चुकतात.बुध्दीचे निर्णय फलदायी ठरतात.माणसाच्या बौधिक आणि शारीरिक क्षमता सक्षम होण्यासाठी त्याला ज्ञानाची गरज असते.ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी असते तर भक्तीशिवाय कर्म आंधळे असते. एखादी गोष्ट साध्य करावयाची असेल तर,त्यासाठी अपार कष्ट उपासण्याची तयारी माणसाजवळ असायला हवी.जे संघर्ष करु शकत नाहीत,आणि संकटापुढे टिकाव धरु शकत नाहीत ती माणसे नशिबाला दोष देत जीवनाच्या परीक्षेत अपयशी ठरतात.माणसाने ध्येय निश्चित करुन त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला की, कोणत्याही अडचणी त्याला अडवू शकत नाहीत.एखादी व्यक्ती नीतिमान,कल्पक,क्रियाशील आणि सेवाशील असेल आणि त्याचे वारसदारही कर्तबगार असतील तर सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक विकासाचे सुंदर पर्व उभे राहू शकते,हे नामदेवराव परजणे यांच्या परिवाराने सिध्द केलेले आहे.संवत्सर परिसरात उभे राहिलेले ज्ञानसंकूल हे ज्ञानात्मक गुणवत्ता आणि शैक्षणिक उपक्रमशीलतेमुळे ज्ञानाची पंढरी म्हणून नावाजले गेले आहे. उत्तम ज्ञानसंपदा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उध्दाराची उर्जापीठे असतात हे ओळखून आण्णांनी हा शिक्षणाचा ज्ञानयज्ञ संवत्सरला सुरु केला.प्रेम,करुणा,सेवा ही संस्कृतीची मूल्ये जपणारे परजणे हे संवत्सरच्या मातीतील मानवतेचे पुजारी होते.अशा शब्दात ह.भ.प.इंदुरीकर यांनी स्व.परजणे यांच्या कार्याचा शेवटी गौरव केला आहे.
प्रारंभी स्व.परजणे आण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
संवत्सर येथे प. पू. राजधबाबा प्राणवायू स्मृतीवनात वृक्षारोपन, विचारमंथन या संकलीत केलेल्या सुविचार पुस्तिकेचे प्रकाशन तसेच संवत्सर येथील नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालय व कोपरगांव येथील महिला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती रकमेच्या धनादेशांचे वितरणही ह.भ. प.इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.