जलसंपदा विभाग
…या तालुक्यांच्या अतिरिक्त पाणी वापरामुळे श्रीरामपूरची शेती उध्वस्त-आरोप

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उन्हाळा हंगाम मे २०२४ च्या आवर्तन सुरू होऊन १७ ते १८ दिवस झाले परंतु अद्यापही श्रीरामपूर तालुक्यातील पुंछ भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळालेले नाही.याबाबत स्वप्निल काळे नावाच्या कार्यकारी अभियंत्याला संपर्क केला असता सदर अधिकाऱ्याने शेतकऱ्यांची फोन उचलण्यासाठी टाळाटाळ केली असून धरणात पाणी उपलब्ध असूनही श्रीरामपूर तालुक्याचे शेती सिंचन अपूर्ण राहण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी एक प्रसिद्धी पत्रकांव्ये केला आहे.

“श्रीरामपूर तालुक्याला हक्काच्या पाटपाण्यासाठी कोणताही नेता वर्तमानात बोलण्यास तयार नाही.श्रीरामपूरच्या नेत्यांना फक्त अशोक कारखाना,बाजार समिती,नगरपालिका आदी संस्था ताब्यात ठेवून राजकारण करायचे व स्वतःचे प्रपंच करायचे एवढाच उद्देश गेल्या पंधरा वीस वर्षापासून दिसत आहे”-अनिल औताडे,अध्यक्ष,अ.नगर जिल्हा शेतकरी संघटना.
भंडारदरा धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या नियोजनानुसार दि.१० मे रोजी नगर जलसंपदा विभागाच्या वतीने दीर्घ कालावधीचे १४०० क्यूसेक्सने उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे.मात्र हे आवर्तन पूर्ण दाबाने मिळत नसल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप आहे.त्यासाठी त्यांनी जलसंपदाचे उपकार्यकारी अभियंता संजय कलापुरे यांचेशी संपर्क केला असता त्यांनी,”लोणी वरून फ्लो कमी येत असल्याने पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही त्यामुळे आम्हीही हातबल झालो असल्याची हताशता व्यक्त केली आहे.उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता विकास शिंदे यांचे कडून जास्तीचा पाणी वापर होत असल्याचे बोलले जात आहे.श्रीरामपूर तालुक्याला हक्काच्या पाट पाण्यासाठी कोणताही नेता वर्तमानात बोलण्यास तयार नाही.श्रीरामपूरच्या नेत्यांना फक्त अशोक कारखाना,बाजार समिती,नगरपालिकेसारख्या संस्थेत थोरात-विखेच्या मदतीने सदर संस्था ताब्यात ठेवून राजकारण करायचे व स्वतःचे प्रपंच करायचे एवढाच उद्देश गेल्या पंधरा वीस वर्षापासून दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.याबाबत श्रीरामपूर चे आजी-माजी लोकप्रतिनिधी पाटपाणी प्रश्नावर बोलण्यास तयार नाही.
सदर आवर्तनात श्रीरामपूर तालुक्याचे शेती सिंचन अपूर्ण राहिल्यास शेतकरी संघटना कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयास कायमस्वरूपी कुलूप ठोकणार असल्याचा इशाराही शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी शेवटी दिला आहे.
श्रीरामपूर तालुक्याचे भंडारदरा धरणात ३८ टक्के पाणी हिस्सा असूनही प्रत्येक आवर्तनात सदर पाणी मिळत नाही असे पाटबंधारे विभागाच्या माहितीच्या आधारे दिसून आले आहे.आज रोजी एन.बी.शाखेवरील उंदीरगाव,माळेवाडी,सराला,मुठेवाडगाव,खैरी,दिघी आधी बहुतांश गावांचे सिंचन अपूर्ण असून श्रीरामपूर हेडला ४०० क्युसेक ऐवजी २०० क्युसेक पाणी मिळत आहे.जिल्ह्यात थोरात व विखे हे राज्याचे नेते असून त्यांचे कडूनच सातत्याने श्रीरामपूरच्या पाट पाण्यावर अन्याय होत असल्याने येथून पुढच्या काळात शेतकरी संघटना सदर नेत्यांनाही श्रीरामपूर तालुक्यात फिरू देणार नाही असा इशाराही औताडे यांनी दिला.