कोपरगाव तालुका
अवकाळी पाऊस,फळबागांचे शासनाने पंचनामे करुन भरपाई द्यावी-मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव तालुक्यात सोमवार दि. ३१ मे रोजी सायंकाळी अचानक झालेल्या अवकाळी पावसाने आणि वादळाने शेतीचे व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.कोरोना महामारीत अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या नुकसानीमुळे मोठा आर्थिक फटका बसला असून शासनाने महसूल यंत्रनेमार्फत या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे नुकतीच एका पत्राद्वारे केली आहे.
“दि.३१ मे रोजी सायंकाळी वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाला अचानक सुरुवात झाली.पाऊस आणि वादळाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले.आंबा फळांचा झाडाखाली अक्षरशः खच पडला असून मोसंबी,चिक्कू,संत्री,डाळींबाच्या बागाही त्यातून सुटल्या नाहीत, अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिके घेतलेली आहेत.परंतु भाजीपाला पिकांसह उन्हाळी पिके देखील वादळामुळे नष्ट झाली आहेत”-राजेश परजणे,जि.प.सदस्य.
कोपरगांव तालुक्याच्या पूर्व भागासह पश्चिम भागालाही वादळ आणि अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला आहे.अनेक गांवांमध्ये फळबागांचे क्षेत्र मोठे आहे.आंबा,पेरु,डाळींब,चिक्कू,मोसंबी,संत्री,केळी अशा फळबागांसह शेतात भाजीपाला व उन्हाळी पिके वर्तमानात उभी आहेत. या भागात साधारणपणे ८ जूनच्या नंतर पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते,परंतु यावर्षी आठ दिवस आधीच अवकाळी पावसाला प्रारंभ झाला. त्यातच सोमवार दि. ३१ मे रोजी सायंकाळी वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाला अचानक सुरुवात झाली.पाऊस आणि वादळाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले.आंबा फळांचा झाडाखाली अक्षरशः खच पडला असून मोसंबी,चिक्कू,संत्री,डाळींबाच्या बागाही त्यातून सुटल्या नाहीत, अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिके घेतलेली आहेत.परंतु भाजीपाला पिकांसह उन्हाळी पिके देखील वादळामुळे नष्ट झाली आहेत. हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक आपत्तीत हिरावून गेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत सापडला आहे.मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत तर अनेक ठिकाणच्या घरावरील पत्रे अक्षरशः उडून गेली आहेत. घरांचेही मोठे नुकसान झाले आहे.शासनाने या अवकाळी संकटाने नुकसान झालेल्या क्षेत्राचे महसूल यंत्रणेमार्फत पंचनामे करुन आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशीही मागणी श्री परजणे यांनी केली असून या पत्राच्या प्रती उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही पाठविल्या आहेत.