कोपरगाव तालुका
कोपरगावातील अवकाळीच्या नुकसान भरपाईचे पंचनामे तातडीने करा-सूचना
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील काही भागात रविवार (दि.२१) रोजी सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे व काही ठिकाणी गारपीठ झाल्यामुळे काढणीला आलेल्या गहू,कांदा पिकांचे तसेच द्राक्ष,चिक्कू,डाळींब,टरबूज आदी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीचे अचूक पंचनामे करावे अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी कृषी विभागाला दिल्या आहे.
“अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे व झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. नैसर्गिक संकटापुढे आपण हतबल असलो तरी या संकटातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना उभारी देण्याचे आपल्या हातात आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करावे”-आ.काळे
हवामान खात्याकडून मागील आठवड्यात २५ मार्च पर्यंत अवकाळी पाऊस व गारपीठ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्या प्रमाणे कोपरगाव तालुक्यात रविवार (दि.२१) रोजी पावसामुळे तसेच काही ठिकाणी गारपीठ झाल्यामुळे काढणीला आलेल्या गहू, कांदा पिकांचे तसेच द्राक्ष, चिक्कू, डाळींब, टरबूज आदी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीबाबत आ. काळे यांनी तहसील कार्यालय कोपरगाव येथे आढावा बैठक घेवून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना ते बोलत होते.ते म्हणाले की, कोरोना संकटाची तमा न बाळगता शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टातून रब्बी हंगामात गहू, कांदा पिकांचे शिवार फुलले होते व द्राक्ष,चिक्कू,डाळींब,टरबूज आदी फळांचा काढणीचा हंगाम सुरु झाला होता. मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे व झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. नैसर्गिक संकटापुढे आपण हतबल असलो तरी या संकटातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना उभारी देण्याचे आपल्या हातात आहे.मागील आठवड्यात ज्या शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस व झालेल्या गारपिटीमुळे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर करावा.शेतकऱ्यांचे वेळेत पंचनामे करून शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी पंचनामा करणाऱ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. पंचनामे करतांना हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घ्यावी आदी सूचना देवून मदत पुनवर्सन खात्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देवू असे आश्वासन त्यांनी शेवटी दिले आहे.
या वेळी तहसीलदार योगेश चंद्रे,तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव,गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन रोहमारे,अरुण चंद्रे,कोपरगाव जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,नंदकिशोर औताडे,संदीप रोहमारे आदी उपस्थित होते.