कोपरगाव तालुका
आशुतोष काळे नेमकी कोणती भूमिका घेणार कोपरगाव तालुक्यात औत्सुक्य
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची पळे-पळे कोण पुढे पळे तोचि स्पर्धा सुरु झाली असताना कोपरगावात तीच परिस्थिती आहे मात्र सध्या राष्ट्रवादीच्या कुंपणावर बसून असलेले आशुतोष काळे आणि त्यांचे कार्यकर्ते या पातळीवर सध्या स्मशान शांतता असून त्यांचे नेमके काय चालले आहे या बाबत कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर औत्सुक्य निर्माण झाले आहे.
विधान सभेची निवडणूक जवळ आली असताना सध्या राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.तालुक्यात नरेंद्र मोदी मंचचे कोपरगाव पालिकेतील अध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रचाराचा धुराळा सर्व प्रथम उडवला असून त्यांनी तालुक्यातील 79 व राहता मतदार संघातील जवळपास सर्वच म्हणजे दहा गावातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधल्याचे दिसत ते सर्वात आघाडीवर आहे.तर त्या पाठोपाठ भाजपात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले मंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे व गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी एकाएकी तालुक्यात अन्नाचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याचे फलक लावले व त्या पाठोपाठ त्यासाठी गावोगाव जनसंपर्क चालू केला व तो बहुतांशी भागात पूर्ण करत आणला आहे.सत्ताधारी भाजपच्या आ. स्नेहलता कोल्हे यांनी असल्या-नसल्या कामाचे उदघाटन करण्याचा धडाका लावला असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी ढगात सुरु केल्या आहेत.मात्र त्यांचा विरोधक नेमका कोण हे त्यांनी अद्याप जाहीर केलेले नाही. समोर वहाडणे,परजणे व राहता राहिले आशुतोष काळे यांचा अद्याप पक्ष कोणता हे ठरायचे बाकी आहे. व सर्वांचा डोळा भाजपच्या उमेदवारीवर आहे. सत्ताधारी भाजपच्या कोपरगावच्या उमेदवारीवर राज्यातील जेष्ठ नेत्यांचा विजयी होण्याच्या शक्यतेवर विश्वास राहिलेला नाही.व या उमेदवारीचा शब्द काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे याना मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिला आहे. व त्यासाठी ते प्रयत्नरत आहेत.तथापि भाजपने ना.राधाकृष्ण विखे यांना वजनदार मंत्रिपद देण्याचा शब्द दिला होता तो भाजपने पाळलेला नाही.उलट वादग्रस्त खाते देऊन त्यांची किंमत केली आहे.
त्यातच काँग्रेस मधून भाजपात येऊ पाहणाऱ्या त्यांच्या बारा आमदार सहकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही व ते पाहून घेऊ म्हणून अंगठा दाखवलेला आहे.व त्यांची व आमची ओळख असून त्यांच्याशी संपर्क साधू म्हणून टोलवले आहे .त्यामुळे विखेची अवस्था,”तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली असून हे दुखणे कोणाला सांगता येईना व दाखवता येईना” असे अवघड जागेचे बनले आहे.इकडे आशुतोष काळेना तर शब्द देऊन बसले आहे.त्यामुळे आशुतोष काळे यांनी घड्याळाकडे व राष्ट्रवादीच्या नेत्याकडे त्यांच्या आदेशाकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे.आमच्या प्रतिनिधीने जून महिन्यात काळे यांच्या भाजप प्रवेशाचा अंदाज वर्तवल्यावर भल्याभल्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती सत्ताधारी गटाला विशेष म्हणजे या बाबत पक्ष नेतृत्वाने संपूर्ण अंधारात ठेवले होते असे उघड झाले आहे.त्यांनी नंतर मुंबईत जाऊन बरीच आदळआपट केली होती मात्र त्यातून फार काही साध्य झालेले नाही.मात्र त्या नंतर आशुतोष काळे मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुंबई भेटीचे तातडीचे निमंत्रण देऊनही तिकडे फिरकले नाही.
रयतच्या नुकत्याच झालेल्या सातारा येथील बैठकीला काळे व कोल्हे कुटुंबीय व त्या पैकी कोणीही हजर नव्हते त्या ऐवजी कोल्हेनी माजी नगराध्यक्ष दिलीप दारूणकर यांना तर काळे गटाने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांना पाठवले होते.या दोघांनाही रयतच्या कोपरगाव येथील गंगागिरी महाविद्यालयाच्या सल्लागार समितीवर घेतले आहे.व अध्यक्षपदी आमच्या प्रतिनिधीने या पूर्वी दिलेल्या माहिती प्रमाणे भगीरथ शिंदे यांचीच वर्णी लागली आहे.मात्र त्यांनी या बैठकीला जाण्याचे का टाळले हि माहिती समजू शकली नाही.
वरिष्ठ नेत्यांच्या हि बाब लक्षात आल्याने त्यांनी पहिला धक्का श्री सद्गुरू गंगागिरी महाविद्यालयातून या दोन्ही नेत्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या समर्थक कर्मचारी यांची बदलीच्या रूपाने तातडीने सोडचिठ्ठी देऊन टाकली तरीही काळे त्या कारवाईवर बधले नाही हे विशेष! त्यांनतर खा. सुप्रिया सुळे,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व त्या पाठोपाठ जेष्ठ नेते शरद पवार यांचा नगर,पाथर्डी,राहुरी दौरा झाला तरीही त्यांनी तिकडे तोंड फिरवले नाही.या ताटातुटीनंतर त्यांनी कोपरगाव शहर व तालुक्यात जे जे कार्यक्रम घेतले त्यात दहीहंडी,कारखान्याची ,गौतम बँक यांची वार्षिक सभा संपन्न झाली त्या शिवाय प्रश्नमंजुषा कार्यक्रम संपन्न झाला मात्र त्यात त्यांनी चकार शब्दाने तोंड उघडले नाही.पण या सर्व कार्यक्रमात व्यासपीठावरुन राष्ट्रवादीचे घड्याळ व त्याचे काटे गायब झालेले आढळलेले आहे.एवढी जोखीम पत्करून अद्याप भाजप पक्ष प्रवेशाचे संदेश मिळत नसल्याने ते अस्वस्थ झालेले आहे.त्यामुळे त्यांनी थेट लोणीच्या वाड्यावर धाव घेऊन आपले तिकीट कुठल्याही परिस्थितीत फायनल करा यासाठी अट्टाहास धरला आहे,त्यामुळे ते गत तीन चार दिवसापासून तालुक्यातून गायब असल्याचे विश्वसनिय वृत्त आहे.दरम्यान या राजकीय कोलाहालात जर काळे राष्ट्रवादी सोडून गेले तर करायचे काय ? व आगामी उमेदवार कोण या प्रश्नाने वरिष्ठ नेत्यांना छळले असून गत वेळी अशीच गडबड होऊन राष्ट्रवादीला उमेदवारच मिळाला नव्हता व अचानक एका आदिवासी युवकाच्या गळ्यात उमेदवारी घालून देण्यात आली होती.
दरम्यान एका माहिती नुसार राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांनी गत सप्ताहात राष्ट्रवादीची जी उमेदवारीची नगर येथे माजी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे व माजी खा.देविदास पिंगळे व अंकुशराव काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जी चाचपणी झाली व मुलाखती झाल्या त्यात आपली अनामत रक्कम भरली असून मुलाखतही दिली असल्याची माहिती आली आहे.त्यातून त्यांनी ना. राधाकृष्ण विखे किंवा भाजप यांच्याकडून काही दगा फटका झालाच तर आपली राष्ट्रवादी बरी याची दक्षता घेतलेली दिसत आहे.
या वेळी पक्ष आधीपासूनच उमेदवारीच्या चाचपणीला लागला असून चारही इच्छुक पक्षांमधील प्रभावी उमेदवाराच्या शोधात आहे.इकडे भाजप सेनेची युती झाली तर बऱ्याच जणांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.त्यामुळे यातील नाराज उमेदवाराला गळाला लावले जाऊ शकते व त्यातूनच मग तालुक्यात अधिक रंगतदार लढत होणार आहे.या गळाला मग सेनेत मोठ्या पदावर असलेले जाऊ शकतात.आताच्या स्पर्धेत आ. कोल्हे.आशुतोष काळे,व विजय वहाडणे , राजेश परजणे हे भाजपच्या उमेदवारीच्या शोधात आहेच. पण या चौघातील आज काळे हेच सर्वात वरचढ उमेदवार ठरण्याची शक्यता आहे पण केंव्हा भाजपने ना.विखे यांचा केवळ वापर करावयाचा नसेल किंवा राणे बनवायचा नसेल तर ! यातील तिन उमेदवार नाराज होणार आहेत त्यातील काहींनी मराठवाड्यातील माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष यांचेशी संधान बांधलेले आहे.त्यातील मोहऱ्यांच्या शोधात काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी राहील हे उघडच आहे.उद्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात काँग्रेसची मोट बांधण्यासाठी व्यापारी धर्मशाळेत दुपारी चारच्या सुमारास येत आहे पण आता तालुक्यात काँग्रेस शोधावी लागेल अशी स्थिती आहे.अशातच ते या इच्छुक उमेदवारांपैकी चाचपणी करणार व कोण गळाला लागणार याचा कानोसा घेणार हे उघड आहे.