कोपरगाव तालुका
संवत्सर येथील श्रावणमास सप्ताहाची विविध धार्मिक कार्यक्रमांनी सांगता
संवत्सर(प्रतिनिधि)
संवत्सर येथे सालाबादप्रमाणे श्रावणमासातील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह. भ. प. रामकृष्ण महाराज यांच्या काल्याच्या कितनाने झाली. गोपाळकाला आणि कृष्णलिला कार्यक्रमाने भावीक मंत्रमुग्ध झाले होते. अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने संवत्सर येथे सात दिवस अखंड विनावादन, भजन, किर्तन, भारुड, गौळणी, काकड आरती, भुपाळी, पहाटेचा जागर असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. संवत्सरसह आसपासच्या गांवातील भाविकांनीही या सप्ताहाचा लाभ घेतला. काल्याच्या किर्तनात ह. भ. प, रामकृष्ण महाराज यांनी कृष्णलिलेविषयी निरुपण करताना गोपी – सवंगडी, रामायण महाभारतातील विविध दाखले देवून त्याचे महत्व विषद केले. किर्तनानंतर गावकऱ्यांनी घरुनच करुन आणलेल्या भाकरीचा व आमटीचा महाप्रसाद वाटण्यात आला. महाप्रसाद वाटपासाठी नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालय,जनता इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी मदत केली. वर्गणी जमा करण्यासाठी दिनेश दिंडे व सहाणेबाबा यांनी परिश्रम घेतले.
पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे, जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे, उपसरपंच विवेक परजणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सप्ताहातील कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला. याप्रसंगी ह. भ. प. भाऊसाहेब करपे, नामदेवराव पावडे, ह. भ. प. सुभाषराव बिडवे, लहानू गुंड, भिकन लाड, अविनाश बोरनारे, ह. भ. प. वाल्मिक महाराज जाधव, लहानू बढे, ह. भ. प. भोसले महाराज, चांगदेव सोनवणे, ह. भ. प. घेर महाराज यांच्यासह संवत्सर पंचक्रोशीतील अनेक भाविकांनी सप्ताह यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.