कोपरगाव तालुका
कोपरगांव औद्योगिक वसाहतीतील रिक्त भूखंड संवत्सरच्या युवकांना द्या- संवत्सरच्या ग्रामसभेत मागणी
संवत्सर (प्रतिनिधि)
प्रारंभी माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह सांगली व कोल्हापुरातील महापुरात निधन झालेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. उपसरपंच विवेक परजणे यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले.
ग्रामविकासाच्या विविध कामाबद्दल माहिती देताना परजणे पुढे म्हणाले की, गांवात घनकचरा प्रकल्प सुरु करावयाचा आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सोईसाठी क्रीडांगणे तयार करावयाची असून महाविद्यालय व हायस्कूलमध्ये लोकसहभागातून क्षेत्र निर्माण करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढे यावे. नऊचारी परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभिर झालेला असल्याने त्या भागात पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव तयार करुन संबंधित विभागाकडे पाठविण्यात यावा. शेती महामंड जमिनीत पाणी पुरवठ्याच्या योजना राबविता येवू शकतात परंतु महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे या योजना होवू शकत नाहीत. सद्या गणेश बंधाऱ्यामध्ये पाणी साठलेले आहे ते जपून वापरल्यास उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही याकडेही ग्रामस्थांनी लक्ष देण्याची गरज आहे. सद्या डेंग्युसारख्या आजाराची साथ पसरत चालली असून आरोग्य केंद्राने तातडीने औषध फवारणी करावी अशा सूचनाही त्यांनी शेवटी केली आहे.
ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे यांनी वर्तमानात विजेची बिले भरमसाठ येत आहेत परंतु त्याप्रमाणात विजेचा पुरवठा होत नाही. विजेची बिले घरपोच देण्यात यावीत. गांवात राष्ट्रीयकृत बँक सुरु करावी अशा मागण्या केल्या तर संभाजीराव आगवन यांनी सडे बंधारा पाण्याने भरावा, बिरोबा चौक रस्ता व्हावा अशी मागणी केली. लक्ष्मणराव परजणे यांनी रेल्वेच्या पलिकडील भागात पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी केली. बाजार समितीचे संचालक भरत बोरनारे यांनीही सभेत अनेक प्रश्न मांडले.