कोपरगाव तालुका
..या नगरपरिषदेकडून गोदापात्राची स्वच्छता मोहीम संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीची आज कोपरगाव शहरात “माझी वसुंधरा मोहिमे”अंतर्गत स्वच्छता मोहीम मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात राबविण्यात आली आहे.त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
अनेक मार्गाने नदीचे पाणी प्रदूषित होत आहे.वेगवेगळ्या कारखान्यातले दुषित पाणी ओढ्यावाटे नदीपत्रात सोडले जाते.गावातले शहरातले सांडपाणी घन पाणी नदीपत्रात सोडले जाते.या दोन्ही कारणांनी मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रदूषण वाढते.पावसाच्या वाहत्या पाण्याबरोबर माती,गाळ,कचरा,घाण मिसळते आणि पाणी दुषित होते.त्याबाबत जनजागृती करणे गरजेचे बनले आहे.त्यामुळे हि मोहीम राबविण्यात आली आहे-प्रशांत सरोदे,मुख्याधिकारी.
हवा-पाणी-अन्न या माणसाच्या तीन गरजांपैकी पाणी हि दोन क्रमांकाची गरज आहे.आपल्याला पाणी स्वच्छ आणि शुद्ध मिळणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्वाचे आहे.प्रदूषित पाण्यामुळे पोटाचे विकार आणि इतर बरेचसे रोग होतात.पाणी प्रदूषित होण्याची अनेक करणे आहेत आणि याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत.याशिवाय घराच्या छोट्या कारणाने,औद्योगिक कारखाने आदींनी नदीतील पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होतच असते.त्याबाबत जनजागृती करणे गरजेचे बनले आहे.कोपरगाव नगपरिषदेने माझी वसुंधरा या मोहिमेअंतर्गत हि स्वच्छता मोहीम सुरु केली आहे.मात्र हि नैमित्तिक आहे की कायमस्वरूपी हे मात्र समजू शकले नाही.महाराष्ट्राची दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी कोपरगाव शहरातून वाहते पूर्वी बाराही महिने वाहणारे नदी आता वाढत्या प्रदुषणामुळे पावसाचे प्रमाण कमी झाल्याने वाहतांना दिसत नाही.गणेशोत्सव,शारदा उत्सव व इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये नदीच्या पात्रात निर्माल्य विसर्जन मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे नदीपात्रामध्ये घाण पसरलेली आहे.तसेच या ठिकाणी नियमित होत असणारे अस्थी विसर्जन विधी या कारणाने नदीपात्रातील पाणी प्रदूषित व अस्वच्छ होते आहे.
कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानातील जल घटकांतर्गत शहर व शहराच्या परिसरातील जलस्त्रोतांची स्वच्छता अभियानांतर्गत राबविण्याबाबतची कार्यवाही आज ०५ जानेवारी रोजी सकाळी ८.३० ते १०.३० या दरम्यान गोदावरी नदीचे पात्र स्वच्छ करण्यात आले आहे. कचेश्वर व शुक्लेश्वर घाट येथे स्वच्छता मोहीम राबवून नदीपात्रातील व परिसरातील साफ सफाई करण्यात आली.या स्वच्छता मोहिमेमध्ये नदीपात्रातील तीन ट्रक्टर कचरा गोळा करून सदर कचरा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाकडे पाठवण्यात आला आहे.सदर स्वच्छता मोहीम यशस्वी करणे कामी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्याधिकारी सुनील गोरडे,सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी,स्वच्छता विभागाचे कर्मचारी यासह गोदामाई प्रतिष्टानचे आदिनाथ ढाकणे यांच्या सक्रीय सहभागाने यशस्वीपणे राबविण्यात आली आहे.
यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,नगराध्यक्ष विजय वहाडणे,नगरसेवक जनार्धन कदम,शिवाजी खांडेकर,सत्येंन मुंदडा,आदिनाथ ढाकणे यांच्यासह कोपरगाव नगरपरिषदेचे सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी,गोदामाई प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणी हे जीवन आहे.पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत स्वच्छ राहणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे जल,जमीन,जंगल,हवा नैसर्गिक पर्यावरणाचे स्त्रोत आहेत. निरोगी जीवनासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता बाळगली पाहिजे व नैसर्गिक स्त्रोत प्रदूषित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.स्वच्छता अभियान व माझी वसुंधरा अभियान यामध्ये सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा व पर्यावरण संवर्धनात सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी शेवटी केले आहे.