कोपरगाव तालुका
क्रांतिकारक भांगरे,बिरसा मुंडा जयंती साजरी

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आद्य क्रांती कारक राघोजी भांगरे व भगवान बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती कोपरगावात मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.
राघोजींचा जन्म क्षत्रिय महादेव कोळी जमातीत झाला.मराठा सैन्यास हरवल्यानंतर ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारांत गणल्या जाणाऱ्या सह्याद्रीतील किल्ल्यांच्या शिलेदाऱ्या,वतनदाऱ्या काढल्या.परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला.इ.स.१८२८ साली शेतसारा वाढवण्यात आला.सारावसुलीमुळे गोरगरिबांना रोख पैशाची गरज भासू लागली त्यामुळे गोरगरिब सावकार, वाण्याकडून भरमसाठ दराने कर्जे घेऊ लागले.कर्जाच्या मोबदल्यात सावकार जमिनी बळकावू लागले.त्यामुळे राघोजींनी सावकार आणि ब्रिटिश यांच्याविरुद्ध बंडाला सुरुवात केली.
आ.आशुतोष काळे यांनीं आदिवासी बांधवांसाठी खावटी अनुदान कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक पात्र आदिवासी बांधवांना देण्यासाठी त्यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजुर यांना आदेशित केले.कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे व सर्व नगरसेवकांनी,नगरपालिका प्रशासनाने मागील वर्षी सुमारे दोन कोटी खर्चाच्या बाजार ओट्यांना त्यांनी “आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे” बाजार ओटे असे नामकरण केले त्याबाबद्दल त्या दोघांचे अभिनंदन करण्यात आले.
बिरसांना आपल्या वडिलांचे सुगन मुंडांचे जबरदस्तीने धर्मांतरण केल्याबद्दल ख्रिस्ती मिशनऱ्यांचा व इंग्रजांचा मनस्वी राग येत असे.त्यातच अशिक्षित आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा विचार त्यांनी केला. बिरसा मुंडांनी गोडगेडा गावातील स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानले होते.त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याच्या बळावर इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात बिरसा मुंडाने छोटा नागपूर क्षेत्रात इ.स १८९५ साली लढा उभारला.इंग्रजांनी त्याला अटक केली व तुरुंगात अतोनात छळ केला.९ जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला.या आदिवासी नेत्याना जयंती निमित्त आदरांजली वाहण्यासाठी या जयंतीचे आयोजन अकरण्यात आले होते.
आज सकाळी सहा वाजता कोपरगाव तालुक्यातील महादेव कोळी समाजाच्या वतीने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व भगवान बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती उत्सव कार्यक्रम सुरक्षित अंतर राखून साजरा करण्यात आला आहे.यावेळी सर्व समाज बांधवांनी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले.आदिवासी विकास विभागातर्फे लवकरच नगरपालिकेच्या वतीने प्रलंबित आदिवासी सांस्कृतिक भवनाची एक कोटी खर्चाची भव्य वास्तू कोपरगावातील ४५ हजार आदिवासींना सर्व सोयी सुविधांसह वर्षभरात बांधून मिळेल अशी अपेक्षा सर्व समाजबांधवांनी व्यक्त केली.यावेळी आदिवासी महादेव कोळी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित आगलावे जेष्ठ कार्यकर्ते मनोहर शिंदे,भरत आगलावे,चंद्रकांत शेजुळ,लक्ष्मण फुलकर,आदी उपस्थित होते.