जाहिरात-9423439946
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक नागरिकांना घरकुल मंजूर असून देखील स्वत:ची जागा नसल्यामुळे हे नागरिक घरकुलापासून वंचित राहत आहे अशा नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आ.आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिले आहे.
गावातील गावठाण जागा संपुष्टात आल्या आहेत व त्या गावातील शाळा,पाणीपुरवठा योजना,स्मशानभूमी आदी मुलभूत सुविधांसाठी जागा उपलब्ध नाहीत अशा गावातील गावठाण विस्तारीकरणाचे प्रस्ताव गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनीं तातडीने पाठवावे त्याबाबत ग्रामविकास मंत्र्यांकडे आपण पाठपुरावा करणार-आ.काळे
कोपरगाव पंचायत समिती कार्यालय येथे आ.काळे यांनी नुकतीच पंचायत समिती व शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली.या बैठकीत पंचायत समिती व शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,जिल्हा परिषद सदस्या सोनाली साबळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक बाळासाहेब बारहाते,गटविकासअधिकारी सचिन सूर्यवंशी,उपअभियंता उत्तम पवार,कृषी अधिकारी पंडितराव वाघिरे,शेती महामंडळाचे जनार्दन डोंगरे,शिरीष लोहकणे,इरिगेशन विभागाचे दिघे साहेब,तुषार बारहाते,सूनिल कुहिले आदी मान्यवर उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलतांना ते म्हणाले कि,”मतदार संघातील संवत्सर गावातील शेती महामंडळाच्या जागेवर मागील काही वर्षापासून अनेक कुटुंब राहत असून यामध्ये काही शेती महामंडळाचे कामगार देखील आहेत.यामध्ये लक्ष्मणवाडी-२७८,रामवाडी-१७८,भरतवाडी-२८९,दशरथवाडी-२२४,हनुमानवाडी-१३८ आदी ठिकाणी शेती महामंडळाचे कामगार राहत आहेत. या कामगारांना घरकुलासाठी जागा मिळाव्या यासाठी आ.काळे यांच्या सूचनेनुसार सर्व्हे करण्यात आला असून शेती महामंडळाच्या कामगारांना जमिनी देण्याबाबत तातडीने निर्णय घेतला जाणार आहे.त्यामुळे तसेच जे कामगार मयत झाले आहेत अशा कामगारांच्या वारसांना देखील घरकुलासाठी शेती महामंडळाची जागा मिळावी यासाठी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवा अशा सूचना शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.