कोपरगाव तालुका
अल्पवयीन मुलगी बेपत्ता,कोपरगावात गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेली सोळा वर्षाची अल्पवयीन मुलगी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेली असल्याची फिर्याद गायब मुलीच्या पित्याने (वय वर्ष-३६) कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने सुरेगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
एखाद्या घरातून निघून गेलेला मुलगा किंवा मुलगी यांना आपण हरवलेली घोषित करतो.परंतु खरे पाहता अशा हरवलेल्या मुलांपेक्षाही अलीकडे पळून जाणार्यांचे प्रमाण जास्त आहे.त्यातही अनेक मुला-मुलींना पळवून नेण्याचेही कारस्थान अगदी नियोजनपूर्वक घडवून आणले जाते.म्हणून हरवलेल्या मुलांपेक्षाही पळून गेलेल्या किंवा पळवून आणलेल्या मुला-मुलींची समस्या अधिक गंभीर होत चाललेली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी मुलीचा पिता हे व्यावसायिक असून त्यांचा सुरेगाव परिसरात व्यवसाय आहे.ते आपल्या पत्नी व मुलासमवेत सुरेगाव येथे राहतात.त्यांची साधारण सोळा वर्षाची मुलगी असून ती मंगळवार दि.२९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घरातून बेपत्ता झाली आहे.तिचा नजीकचे नातेवाईक,व आप्त स्वकीयांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही.त्यामुळे अखेर शुक्रवार दि.०२ ऑक्टोबर रोजी आपली मुलगी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी आपल्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेली असल्याची फिर्याद मुलीच्या पित्याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं,४९५/२०२० भा.द.वि.कलम ३६३ अन्वये अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.सतीश भताने हे करीत आहेत.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.तालुका पोलीस गायब अल्पवयीन मुलीचा शोध घेत आहेत.