गुन्हे विषयक
नायलॉन मांजाची विक्री,एकावर गुन्हा दाखल

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
सर्वत्र मकर संक्रांत सणानिमित्ताने पंतग उडविण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.परंतु,पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपारिक मांजाऐवजी नायलॉन तसेच काचेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या प्रतिबंधित मांजाची विक्री काही जणांकडून केली जात असल्याचे आढळून आले आहे.अशांवर कोपरगाव पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून शहरात अवैध नायलॉन मांजाची विक्री करणारा आरोपी मतीन जब्बार मणियार (वय-३२) याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे अवैध मांजा विक्री करणाऱ्या अपप्रवृत्तीत खळबळ उडाली आहे.

दरम्यान कोपरगाव शहरात तरुणांनी चिनी मांजा वापरू नये व नागरिक पक्षी,प्राणी यांना इजा होईल असे वर्तन करू नये असे आवाहन स्वच्छता दुत सुशांत घोडके यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले आहे.
मकरसंक्रात सणानिमित्ताने पंतग उडविण्यासाठी नायलॉन मांजाची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते.त्यातच पतंग बाजीचे माहेरघर असलेले येवला शहर जवळ असल्याने त्यास आणखी जोर येताना दिसून येत आहे.मात्र नायलॉन मांजामुळे पक्ष्यांना व नागरिकांना अनेकदा गंभीर इजा झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत.हे सर्व प्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नायलॉन मांजाची घाऊक व किरकोळ बाजारात विक्री करण्यास मनाई केली आहे.तसेच जिल्ह्यात नायलॉन मांजाचा वापर होऊ नये,यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.तरीही काही असामाजिक तत्व या आदेशाचा भंग करताना दिसत आहे.त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिस दक्ष झाल्याचे समोर आले आहे.त्यांनी अशा अपप्रवृत्ती विरुध्द मोहीम उघडली असून त्यांचे विरुध्द गुन्हे दाखल करण्यात सुरुवात केली आहे.यातील पहिला आरोपी म्हणून जुन्या तहसीलजवळ रहिवासी असलेला इसम मतीन जब्बार मणियार याचे विरोधात शहर पोलिस ठाण्याचे पो.कॉ.श्रीकांत बाळू कुऱ्हाडे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-५५९/२०२४भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम २२३,१२५सह पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ५,१५ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, पो.हे.कॉ.बी.एच.तमनर आदींनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.तमनर हे करीत आहेत.