शैक्षणिक
कोपरगाव तालुक्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळणार

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव तालुक्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके देण्यात येतील.एकही विद्यार्थी पाठ्यपुस्तका पासून वंचित राहणार नाही याची दक्षता पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून घेतली जात असल्याची महिती कोपरगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी दिली आहे.
शाळा सुरु होण्याच्या आधी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पोहचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.यावर्षी देखील सर्व विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके मिळणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.समग्र शिक्षा अभियानातंर्गत पाठ्यपुस्तकाच्या वितरणाला नुकतीच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली आहे.
कोपरगाव तालुक्यात इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या जिल्हा परिषद, नगरपालिका व खाजगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक अशा २२३ शाळा आहेत. इयत्ता व विषयनिहाय तालुक्याची १ लाख ७३ हजार ४४२ इतक्या पाठ्यपुस्तकांची मागणी होती. त्यानुसार २१ मे २०२२ रोजी ९३% व ३ जून २०२२ रोजी ७% पाठयपुस्तके प्राप्त झाली आहेत.लगेचच तालुका स्तरांवरून ७ जून २०२२ अखेर १०० टक्के पाठ्यपुस्तके शाळास्तरांपर्यंत वाटप करण्यात आली आहेत.
दि.१३ जून २०२२ रोजी नवीन शैक्षणिक वर्षाला उत्साहाने सुरुवात होत आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पाध्यक्ष,समिती सदस्य तसेच लोकप्रतिनिधी व पालकांच्या उपस्थितीत या पाठ्य पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे.असेही गटविकास अधिकारी श्री.सुर्यवंशी यांनी शेवटी सांगितले आहे.