कोपरगाव तालुका
पाण्यात पडून युवक ठार,अकस्मात मृत्यूची नोंद
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत दत्तनगर येथे रहिवाशी असलेला व नजीकच्या सहकारी साखर कारखान्यात वाहन विभागात अस्थायी स्वरूपात चालक या पदावर सेवेत असलेला तरुण अतुल सुभाष उन्डे (वय-२०) याचे आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास पोहण्यास गेला असता पाण्यात पडून त्याचे निधन झाले आहे.त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आलेल्या मृतांच्या उत्तरीय तापसणीसाठी करणाऱ्या कर्मचाऱ्यास कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर त्याच्या सुरक्षेसाठी ग्रामीण रुग्णालयाने पी.पी.ई.किट उपलब्ध करून देण्यात आलेले नाही अशी धक्कादायक माहिती उपलब्ध झाल्याने प्रशासनाच्या या गलथान व बेजाबदार कारभाराबाबत प्रतिकूल प्रतिक्रिया उमटल्या आहेत व या कर्मचाऱ्यास तातडीने पी.पी.ई. किट उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.या बाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क स्थापित होऊ शकला नाही.
शिंगणापूर हद्दीत रामसिंग बाबा मंदिरानजिक दगडाची खाण असून या खाणीत सध्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचलेले आहे.त्या ठिकाणी काही मुले दुपारच्या कडक उन्हात पोहण्यास गेले असता हि दुर्घटना घडली आहे.हि बाब नजीकच्या नागरिकांच्या लक्षात आल्यावर धावाधाव करून या तरुणाला पाण्याच्या बाहेर काढण्यात आले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.त्याचे शव उत्तरीय तपासणीसाठी कोपरगाव नगरपरिषद हद्दीत असलेल्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद क्रं.३५/२०२० सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए. एम.दारकुंडे हे करीत आहेत.