कोपरगाव तालुका
..या गावातील ऋषीपंचमी सोहळा अखेर स्थगित !
जनशक्ती न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
संवत्सर येथील रविवार दि.२३ ऑगष्ट रोजीचा ऋषीपंचमीचा सोहळा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी दिली आहे. या सोहळ्यानिमित्त दरवर्षी होणाऱ्या ह.भ.प.मिराबाई मिरीकर यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमालाही महिला व भाविकांना मुकावे लागणार आहे.
हिंदूंच्या चालीरीतींप्रमाणे,भाद्रपद शुद्ध पंचमी हे स्त्रियांनी करावयाचे एक व्रत आहे. या दिवशी स्त्रिया ऋषींची मनोभावे व षोडशोपचारे पूजा करतात. यावरून या दिवसाला ऋषिपंचमी हे नाव मिळाले.कश्यप,भारद्वाज,विश्वामित्र,गौतम,जमदग्नी,वसिष्ठ आणि अत्रि या सात ऋषींची प्रत्येकी एक आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधतीची एक अशा एकूण ८ सुपाऱ्या मांडून ही पूजा सिद्ध केली जाते.या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही.हा उत्सव संवत्सर येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात करण्यात येतो.
संवत्सर हे गांव रामायण काळातील दंडकारण्याचा परिसर म्हणून ओळखला जातो.गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या संवत्सरमध्ये रामायण काळातील थोर महर्षि शृंगऋषींचे वास्तव्य होते.त्यांचे मोठे मंदीर या ठिकाणी आहे.या शृंगऋषींना राजा दशरथाने श्री रामाच्या जन्माच्या अगोदर पुत्र कामेष्ठी यज्ञासाठी या ठिकाणाहून नेलेले होते. म्हणून या ठिकाणाला अनन्य साधारण महत्व आहे.ऋषीपंचमीच्या दिवशी संवत्सर येथे प.पू.रामदासी महाराज यांच्या प्रेरणेणे स्व. नामदेवराव परजणे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी किर्तनाचा कार्यक्रम व्हावा म्हणून त्यादृष्टीने परंपरा चालू ठेवलेली होती.ती आजतागायत सुरु आहे.शृंगऋषींच्या मंदिराजवळील गोदावरीच्या काठावर महिला मोठ्या संख्येने स्नानाची पर्वणी साधतात.ह.भ.प.मिराबाई मिरीकर यांनी दरवर्षी संवत्सरला येवून किर्तन सेवा पार पाडण्याचे वचन दिलेले त्यानुसार श्री शनी मंदिराच्या प्रांगणात दरवर्षी किर्तनाचा कार्यक्रम होत असतो.
या वेळी मात्र या सर्वच धार्मिक कार्यक्रमांस भावीकांना मुकावे लागणार आहे.यावर्षी गोदावरी नदीतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह सुरु असल्याने स्नानाची पर्वणी साधण्यासाठी येणाऱ्या महिलांनी व भाविकांनी जास्त गर्दी न करता व थेट नदी पात्रात खोलवर न उतरता काठावरुनच स्नानाचा लाभ घ्यावा असे आवाहनही राजेश परजणे पाटील, कृष्णराव परजणे पाटील, विवेक परजणे व ग्रामस्थांनी शेवटी केले आहे.