कोपरगाव तालुका
कोपरगावच्या पूर्व भागाचे पावसाने मोठे नुकसान
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात सोमवार रोजी धोत्रे, तळेगाव मळे व खोपडी परिसरात २ ते ५: ३० या वेळेत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान होऊन नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्य, वाहून जाऊन नागरिकांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती मिळताच आ.आशुतोष काळे यांनी रात्री उशिरा जाऊन झालेल्या नुकसानीची तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या समवेत परिस्थितीची पाहणी करून त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवार (दि.१६) रोजी प्रांताधिकारी गोविंद शिंदे,तहसीलदार योगेश चंद्रे व तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी कर्मचाऱ्यांच्या चार टीम करून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यात आले आहेत.
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील धोत्रे, तळेगाव मळे व खोपडी परिसरात झालेल्या पावसाने शेतात पाणी साचून बाजरी,सोयाबीन,मका,कपाशी,मुग आदी पेरणी झालेल्या पिकांचे जवळपास ८० ते ९० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. कांद्याच्या चाळीत पाणी शिरून कांदे भिजल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान त्रासदायक ठरणार आहे.धोत्रे येथील आदिवासी वसाहत व दलित वस्ती शहा वसाहतमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील धोत्रे, तळेगाव मळे व खोपडी परिसरात झालेल्या पावसाने शेतात पाणी साचून शेताचे अक्षरशः तळे होऊन बाजरी,सोयाबीन,मका,कपाशी,मुग आदी पेरणी झालेल्या जवळपास ८० ते ९० टक्के पिकांचे नुकसान झाले असून त्याचबरोबर कांद्याच्या चाळीत पाणी शिरून साठविलेल्या कांदे पावसाच्या पाण्याने भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.धोत्रे येथील आदिवासी वसाहत व दलित वस्ती शहा वसाहतमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले. अन्न धान्य कपडे महत्वाची कागदपत्रे ओले झाले होते. या नुकसानीची आ.आशुतोष काळे यांनी पाहणी करून नागरिकांना धीर दिला. एकही नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अचूक आकडेवारी शासनाकडे पाठवावी.झालेल्या नुकसानीची त्या-त्या पटीत नुकसानग्रस्तांना भरपाई मिळेल यासाठी प्रयत्न करावे. शेतात नुकतीच पेरणी केलेले बियाणे या पावसात वाहून गेले आहेत व नागरीकांचे दैनंदिन वापराचे साहित्य देखील वाहून गेल्यामुळे मदत प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिल्या आहेत. यावेळी आ.आशुतोष काळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना सुरुक्षित स्थळी हलवून मदत करण्याच्या सूचना दिल्या.त्याप्रमाणे कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,उपसरपंच तालीब सय्यद,कृषी मित्र गणेश घाटे,आल्लानुर सय्यद,राजेंद्र माळवदे,अहमद मलंग,मकसूद शेख, रमेश देवकर,गणेश चव्हाण आदी कार्यकर्त्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली. आ.आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार मंगळवार (दि.१६) रोजी सकाळी ८ वाजेपासूनच तहसीलदार योगेश चंद्रे व तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्या पथकाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्षात पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान प्रांताधिकारी गोविंद शिंदे,पंचायत समिती सभापती पोर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,जिल्हा परिषद सदस्या सोनाली साबळे,पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांनी देखील पाहणी करून पंचायत समितीच्या कृषी विभागाला मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.